Israel Benny Gantz Resign : नेतान्याहू यांच्यामुळे आम्ही हमासला संपवू शकत नाही !

इस्रायल युद्ध मंत्रीमंडळातून बेनी गँट्झ यांचे त्यागपत्र

इस्रायल युद्ध मंत्रीमंडळातील मुख्य सदस्य बेनी गँट्झ

तेल अविव (इस्रायल) – नेतान्याहू यांच्यामुळे आम्ही हमासला संपवू शकत नाही. त्यामुळे आम्ही आणीबाणीच्या सरकारला जड अंतःकरणाने; पण आत्मविश्‍वासाने सोडत आहोत, असे सांगत इस्रायलच्या ३ सदस्यीय युद्ध मंत्रीमंडळातील मुख्य सदस्य बेनी गँट्झ यांनी त्यागपत्र दिले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गँट्झ यांना निर्णय मागे घेण्यास सांगितले आहे. ‘ही वेळ लढ्यापासून मागे हटण्याची नसून त्यात सहभागी होण्याची आहे’, असे ते म्हणाले. गँट्झ यांच्या त्यागपत्रामागे गाझा युद्धातील ओलिसांच्या सुटकेविषयीची नेतान्याहू यांची मानसिकता हे कारण असल्याचे म्हटले जात आहे.

१. गँट्झ यांनी नेतान्याहू यांना आवाहन केले की, निवडणुका सर्वसाधारणपणे स्वीकारल्या जाणार्‍या दिनांकाला झाल्या पाहिजेत, जेणेकरून लोकांचा विश्‍वास जिंकू शकेल आणि आव्हानांना तोंड देऊ शकेल, असे सरकार स्थापन करता येईल. धोरणांचा निषेध महत्त्वाचा आहे; परंतु ते कायदेशीररित्या करणे आवश्यक आहे. द्वेषाला प्रोत्साहन देण्यात येऊ नये. आम्ही एकमेकांचे शत्रू नाही. आमचे शत्रू आमच्या सीमेबाहेर आहेत.

२. इस्रायलमध्ये माजी सैन्यप्रमुख गँट्झ यांना नेतान्याहू यांचे प्रमुख राजकीय विरोधक म्हणून पाहिले जाते. युद्ध मंत्रीमंडळात सहभागी होण्यापूर्वी ते विरोधी पक्षाचे प्रमुख सदस्य होते. ७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी हमासच्या आक्रमणानंतर लगेचच ते नेतान्याहू यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले.