हवामान पालटामुळे अलास्का (अमेरिका) येथील नद्यांचा रंग पालटून झाला नारिंगी !

हवामानामुळे येथील नितळ नद्यांच्या पाण्याचा रंग पालटून तो नारिंगी झाला

जुनू (अलास्का) – पालटत्या हवामानामुळे येथील नितळ नद्यांच्या पाण्याचा रंग पालटून तो नारिंगी झाल्याचे एका अभ्यासाअंती निदर्शनास आले आहे. अमेरिकेतील डेव्हिस येथील ‘नॅशनल पार्क सर्व्हिस’, पॅलिपहर्निया विद्यापीठ आणि अमेरिकेतील काही भूवैज्ञानिक यांनी या अभ्यासात भाग घेतला होता. जगभरातील संशोधकांनीही या घटनेची गांभीर्याने नोंद घेतली असून त्यावर अभ्यास चालू केला आहे. अलास्कातील नद्याच नव्हे, तर काही नाले आणि ओढे यांचे पाणीही नारिंगी होऊ लागले आहे. पृथ्वीचा ‘पर्माफ्रॉस्ट’ (गोठलेली भूमी) वेगाने वितळत आहे, हे यामागचे प्रमुख कारण असल्याचे सध्या तरी अभ्यासातून समोर आले आहे.

१. ‘पर्माफ्रॉस्ट’च्या या वितळण्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागातून शिसे, जस्त, निकेल, तांबे, लोह यांच्या संपर्कात पाणी येऊ लागल्याने हा परिणाम दिसत आहे.

२. पर्माफ्रॉस्ट वितळू लागल्याने रंग पालटत असलेल्या अशा नद्या आणि नाले यांपैकी काहींचा आजूबाजूच्या परिसंस्थेवरही घातक परिणाम होत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

३. संशोधकांनी अलास्कातील ब्रूक्स येथील जलमार्गांतील ७५ ठिकाणातील नाले, नद्या आदींच्या चाचण्या केल्या. पाण्याचा रंग पालटण्याच्या प्रक्रियेला ५ ते १० वर्षांपासून आरंभ झाल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.