जम्मू-काश्मीरमध्ये ८० हून अधिक आतंकवादी घुसले !

पोलीस महासंचालकांची माहिती !

प्रतिकात्मक चित्र
पोलीस महासंचालक आर्.आर्. स्वेन

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरमधून होणार्‍या आतंकवाद्यांच्या भरतीत मोठी घट झाली असली, तरी परदेशी आतंकवाद्यांची संख्या वाढली आहे. ‘राज्यात ७० ते ८० परदेशी आतंकवादी शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा घेऊन घुसले आहेत. ते येथील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. अलीकडेच त्यांनी लोकांना वीज पुरवठा करणारे विजेचे टॉवर उडवण्याचा प्रयत्न केला’, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक आर्.आर्. स्वेन यांनी दिली.

पोलीस महासंचालक स्वेन पुढे म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या शांततेसाठी पोलीस काही लोकांवर कडक कारवाई करत आहेत. स्थानिक आतंकवाद्यांच्या भरतीवर नियंत्रण आल्याने मला आनंद होत आहे. आतंकवाद स्थानिकाकडून परदेशी आतंकवादाकडे जात आहे. तरुणांना बंदुकांपासून दूर ठेवण्याचे आमचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. त्यामुळे अनेक महिला विधवा होण्यापासून वाचल्या आहेत, अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त होण्यापासून वाचली आहेत आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचले आहे. पोलिसांना परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जम्मू-काश्मीरमध्ये शांततापूर्ण अन् भयमुक्त वातावरण राखले जाईल, जसे लोकसभा निवडणुकीत दिसून आले होते.

संपादकीय भूमिका

  • प्रतिवर्षी काश्मीरमध्ये १०० ते २०० आतंकवाद्यांना ठार मारले जाते, तरी पाकमधून नवीन आतंकवादी काश्मीरमध्ये घुसखोरी करतात. ही घुसखोरी रोखण्यासासाठी पोलीस आणि सुरक्षादल यांना अपयश येते, हेच यातून लक्षात येते !
  • पाकमधील आतंकवादी निर्मितीचे कारखाने जोपर्यंत बंद केले जात नाहीत, तोपर्यंत ही स्थिती पुढे अनेक वर्षे चालूच राहिल !