‘मुंबई येथील सेवाकेंद्रात मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा प्रत्यक्ष सत्संग लाभला. प.पू. डॉक्टर माझ्या जीवनात आल्यामुळे मला जीवनाचे ध्येय समजले आणि त्यांच्या कृपेने मला तिथे साधना अन् सेवा करण्याची संधी लाभली. माझ्या साधनेच्या आरंभीच्या काळात त्यांनी मला व्यवहार आणि साधना यांची प्रत्यक्ष शिकवण देऊन घडवले. साधनेच्या मार्गावर चालण्यासाठी त्यांनी मला शक्ती, बुद्धी आणि प्रेरणा दिली. ‘प्रत्येक क्षणी प.पू. डॉक्टर माझ्या पाठीशी असून तेच माझ्याकडून सर्व करून घेत आहेत’, याची मला सतत जाणीव असते. ‘आतापर्यंत माझ्याकडून झालेली साधना’, ही केवळ आणि केवळ प.पू. डॉक्टरांची कृपाच आहे. त्यामुळे मला त्यांच्याविषयी वाटणारी कृतज्ञता शब्दातीत आहे. तरीही त्यांनीच व्यक्त करून घेतलेली कृतज्ञतारूपी शब्दसुमने त्यांच्या सुकोमल चरणी अर्पण करतो. ८ जून २०२४ या दिवशीच्या अंकात ‘सद्गुरु सत्यवान कदम यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेली प्रथम भेट’ आणि अन्य सूत्रे पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहू.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे
४ अ. स्वच्छता आणि नीटनेटकेपणा : सेवाकेंद्रात प.पू. डॉक्टर आणि डॉ. (सौ.) कुंदाताई यांच्याकडून मला पुष्कळ शिकायला मिळत असे. दोघेही प्रत्येक गोष्ट चांगलीच करायचे. त्यांच्या घरातील साहित्य व्यवस्थित लावलेले असायचे. त्यांना स्वच्छता आवडत असे. त्यांना भूमीवर कुठेही डाग दिसला, तर ते तो पुसून स्वच्छ करत असत.
४ आ. सकाळी लवकर उठून नामजप, सेवाकेंद्राची स्वच्छता आणि स्वयंपाक करणे इत्यादी अनेक गोष्टी करायला शिकवणे : त्यांनी मला सर्व प्रकारच्या सेवा शिकवल्या, उदा. प्रतिदिन सेवाकेंद्राचा स्वच्छ केर काढणे, आठवड्यातून एकदा पंखे, खिडक्या पुसणे, धुलाईयंत्र (वॉशिंग मशीन) स्वच्छ ठेवणे, घरातील नळ दुरुस्त करणे इत्यादी. ‘शीतकपाट (फ्रिज) प्रतिदिन पाहून अनावश्यक वस्तू बाहेर काढणे आणि शीतकपाटही आठवड्यातून एकदा स्वच्छ करणे, सेवाकेंद्रात आलेल्या फळांपैकी प्रथम कुठली आणि नंतर कुठली फळे खायची, भाज्यांमध्येही प्रथम कुठल्या आणि नंतर कुठल्या भाज्या वापरायच्या, स्वयंपाक कसा करायचा ?’ इत्यादी सर्वच गोष्टी त्यांनी मला शिकवल्या. त्याच समवेत त्यांनी मला ‘सकाळी लवकर उठून नामजप करायला हवा’, हेही शिकवले.
४ इ. सेवाकेंद्रात आलेल्या साधकांचे आदरातिथ्य करायला शिकवणे : त्यांनी मला सेवाकेंद्रात कुणी पाहुणे आल्यास ‘त्यांच्याशी कसे बोलावे ?’, ‘त्यांचे आदरातिथ्य कसे करायचे ?’, ‘त्यांना प्रतिसाद कसा द्यायचा ?’, हेही शिकवले. ‘एखादा साधक सेवा करत असेल, त्याने सेवा थांबवून प्रथम थोडे पाहुण्यांशी बोलावे. साधक बाहेर जात असतील, तर त्यांना जिन्यापर्यंत सोडायला जावे. खाऊ देतांना ‘त्यांना तिखट कि गोड खाऊ आवडतो’, हे विचारून द्यावा’, अशा अनेक गोष्टी त्यांनी मला शिकवल्या.
४ ई. प.पू. भक्तराज महाराज यांची सेवा करायला शिकवणे : प.पू. डॉक्टरांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) मुंबई येथे प.पू. डॉक्टरांच्या घरी येत असत. ‘ते येण्यापूर्वी सिद्धता कशी करायची ?’ किंवा ‘प.पू. बाबा मुंबई सेवाकेंद्रात निवासाला येणार असतील, तर ती सर्व सिद्धता कशी करायची ?’, हे शिकवून त्यांनी मला ‘संतसेवा कशी करायची ?’, हे शिकवले.
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून शिकायला मिळालेले गुण
५ अ. तत्परता : प.पू. डॉक्टर वीज आणि दूरभाष यांची देयके तत्परतेने भरत असत.
५ आ. काटकसर : प.पू. डॉक्टर लिहिण्यासाठी वेगवेगळ्या आकाराचे पाठकोरे कागद एकत्रित करून ठेवत असत. त्यातही ते ‘लहान, मध्यम आणि मोठ्या लिखाणासाठी त्या-त्या आकाराचे कागद वापरता येतील’, असे त्यांचे वर्गीकरण करून ठेवत असत.
५ इ. साधकांच्या सेवेचे नियोजन करतांना ‘साधकांचा वेळ वाया जाणार नाही’, याची पूर्ण काळजी घेणे : मुंबई सेवाकेंद्रात बरेच साधक सेवेसाठी येत असत. प.पू. डॉक्टर स्वतःच सर्व साधकांच्या सेवेचे नियोजन करत असत. ‘कुठली सेवा आधी आणि कुठली नंतर करायची’, याविषयीही ते सांगत असत. ‘कुणी साधक सेवेविना रहात नाही ना ?’, याकडेही त्यांचे लक्ष असे. ते सर्व साधकांसाठी आधीच सेवा काढून ठेवत असत. त्यामुळे सर्व साधक सेवेत व्यस्त रहायचे. प.पू. डॉक्टर बाहेरगावी जातांना साधकांच्या सेवेचे नियोजन करून जात असत. त्यानंतर त्यांनी मला अन्य साधकांच्या सेवांचे नियोजन करायला शिकवले.
५ ई. सतर्क राहून सेवा करायला शिकवणे : कधी कधी पेट्रोल आणि डिझेल पुरवठा करणार्यांचा संप असायचा. प.पू. डॉक्टर संपाच्या आधीच एक दिवस गाड्यांमध्ये इंधन भरून आवश्यक तो साठा करायला सांगायचे. ‘कुठल्याही गोष्टीची कधी न्यूनता पडू नये’, यांसाठी ‘सर्व बाजूंनी विचार करून प्रत्येक सेवा सतर्क राहून कशी करायची ?’, हे त्यांनी मला शिकवले.
५ उ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या भंडार्याच्या वेळी सेवा करायला शिकवणे : प.पू. डॉक्टर प.पू. भक्तराज महाराज यांच्याकडे भंडार्याला जातांना ‘आम्हा साधकांना त्यातून शिकता यावे’, यासाठी घेऊन जात असत. तेथे गेल्यावर ते स्वतः सेवा करत आणि आमच्याकडूनही सेवा करून घेत असत, उदा. ‘बाजारातून सामान आणणे, भाज्या निवडण्यासाठी साहाय्य करणे, भंडार्यात वाढणे, नंतरचे आवरणे, इत्यादी.’ प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे आम्हाला प.पू. भक्तराज महाराज यांच्या भंडार्यात या सेवा शिकता आणि करताही आल्या.
५ ऊ. अभ्यासवर्गाच्या वेळी सेवा करून घेणे : शनिवार आणि रविवार या दिवशी प.पू. डॉक्टर अभ्यासवर्ग घेत असत. ते मला अभ्यासवर्गाच्या ठिकाणीही घेऊन जात आणि तिथे सेवा करायला सांगत असत. ‘माझ्यामध्ये सभाधीटपणा यावा’, यासाठी ते मला काही सूत्रे अभ्यासवर्गात मांडायला सांगत असत.
५ ए. अडचणी मांडल्यावर त्वरित उपाययोजना सांगणे : प्रथम मी फलक रंगवणे, ‘स्क्रिन प्रिंटिंग’ करणे इत्यादी सेवा शिकून घेतल्या. सेवेत आलेल्या अडचणी प.पू. डॉक्टरांना सांगितल्यावर त्यांच्याकडून लगेच अडचणींवर उपाय मिळत असे. त्यामुळे सेवेस गतीही मिळत असे.
५ ऐ. साधकांना चुकांची जाणीव होण्यासाठी त्यांच्या चुका सर्वांसमोर सांगणे : प.पू. डॉक्टर आम्हा साधकांकडून होणार्या चुका तत्परतेने सांगत; मात्र ते चुका एकट्याला न सांगता त्या सर्वांसमोर सांगत. त्यामुळे आम्हाला आमच्या चुकांची जाणीव होत असे आणि त्यातून इतरांनाही शिकता येत असे.
६. परिपूर्ण बनण्यासाठी साधकांना सर्व प्रकारच्या सेवा शिकून घेण्यास सांगणे
प.पू. डॉक्टरांना ‘साधक परिपूर्ण असावा’, असे वाटत असे. त्यामुळे त्यांनी मला संगणक शिकायला आणि गाडी चालवायला अन् गाडीचे पंक्चर झालेले टायर पालटायला शिकायला सांगितले. त्यांनी सुतारकाम, वीजजोडणी (इलेक्ट्रीक), ‘प्लंबिंग’, इत्यादी आवश्यक कामांचे साहित्य सेवाकेंद्रात ठेवले होते. ‘प्रत्येक साधकाला कुठलीही सेवा करता आली पाहिजे’, यासाठी त्यांचे प्रयत्न असायचे.
७. शिकायला मिळालेली सूत्रे कृतीत आणण्याचा प्रयत्न करणे
प.पू. डॉक्टरांनी आम्हा साधकांना मुंबई सेवाकेंद्रात जे शिकवले, ते आता मी कृतीत आणण्याचा प्रयत्न करतो. तेच आमच्याकडून हे सर्व प्रयत्न करून घेत आहेत. प.पू. डॉक्टरांमुळे मला प्रचारात (त्यांच्या समष्टी रूपाची) सेवा करतांना अधिक व्यापक होता आले. आता त्यांच्याप्रमाणे आदर्श राहून प्रचारात इतरांकडून तशी सेवा करून घेण्याचा मी प्रयत्न करतो.
८. साधना करण्यासाठी कुटुंबियांचे सहकार्य लाभणे
मी साधनेसाठी घर सोडून आश्रमात जातांना मला कुटुंबियांनी विरोध केला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आरे या गावातील आमच्या घरी प.पू. डॉक्टर आले होते. प.पू. डॉक्टरांच्या कार्यक्रमांना घरातील सर्व जण आवडीने जात असल्यामुळे घरातून कुणाचाही साधनेला विरोध नव्हता. आताही माझे कुटुंबीय साधना करतात.
९. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे जीवन चिंतामुक्त होणे
गुरुदेवांच्या कृपेने मला भविष्याची चिंता वाटत नाही. माझे मन निर्विचार असते. काही प्रसंग आले, तरी मला स्थिर राहून ते हाताळता येतात. आता मी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील अध्यात्मप्रचाराची सेवा पहातो. ‘दोन्ही जिल्ह्यांतील साधकांची प्रगती व्हावी’, यासाठी त्यांना लागेल ते साहाय्य करण्याचा प्रयत्न करतो. ‘विज्ञापनदाते, अर्पणदाते, हितचिंतक, धर्मप्रेमी यांना साधनेत पुढे कसे नेता येईल ?’, ‘गुरुकार्य चांगले कसे करता येईल ?’, एवढाच विचार माझ्या मनात असतो, अन्य विचार नसतात.’ (समाप्त)
– (सद्गुरु) सत्यवान धोंडू कदम (वय ६१ वर्षे), कुडाळ सेवाकेंद्र (जिल्हा सिंधुदुर्ग) (२७.०२.२०२४)
श्री. सत्यवान कदम (आताचे सद्गुरु सत्यवान कदम) यांच्या प्रथम भेटीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘याला तर, याच जन्मात देव भेटणार आहे’, असे सांगणे
एका गुरुवारी मी श्री. सत्यवान कदम (माझे चुलत भाऊ, आताचे सद्गुरु सत्यवान कदम) यांना घेऊन येथे गुरुदेवांकडे गेलो. मी गुरुदेवांना त्यांचा परिचय करून दिला. त्यांना पाहून गुरुदेवांना पुष्कळ आनंद झाला आणि ते मला म्हणाले, ‘‘याला तर याच जन्मात देव भेटणार आहे.’’ त्या क्षणापासूनच सद्गुरु सत्यवान कदम गुरुमय झाले. त्यांची ती अलौकिक भेट पाहून मला स्वामी विवेकानंद आणि श्री रामकृष्ण परमहंस यांची भेट आठवली. श्री रामकृष्ण परमहंस विवेकानंदाना म्हणाले होते, ‘‘नरेंद्र, तुमने बडी देर कर दी । मैं तो तुम्हारी प्रतीक्षा कर रहा था ।’’ गुरुदेवांची सर्वज्ञता आज आपण सर्व जण अनुभवत आहोतच.’
– श्री. विष्णु कदम (वय ६४ वर्षे), आरे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग. (१५.२.२०२४)
साधकांच्या कौशल्यानुसार त्यांना सेवा देणे
एखाद्या साधकाकडे विशेष कौशल्य असेल, तर प.पू. डॉक्टर त्याला त्याच्या कौशल्याशी निगडित सेवा देत असत. कु. अनुराधा वाडेकर (आताच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर) आणि कु. श्रृती शेलार (आताच्या सौ. जान्हवी रमेश शिंदे) यांच्याकडे ग्रंथांचे मुखपृष्ठ सिद्ध करण्याची सेवा असायची. त्या दोघी कलेच्या जाणकार असल्याने प.पू. डॉक्टरांनी त्यांना ती सेवा दिली होती. त्या कधी तातडीच्या सेवा करत असतांना अन्य साधकांनी त्यांना दुसरी सेवा सांगितली, तर प.पू. डॉक्टर त्या साधकांना सांगायचे, ‘‘या सेवा अन्य कुणीही करू शकतो; पण मुखपृष्ठाची सेवा याच करू शकतात. या सेवेची फलनिष्पत्ती चांगली मिळण्यासाठी या सेवेला प्राधान्य देणे आवश्यक आहे.’’ यातून प.पू. डॉक्टरांनी आम्हाला ‘साधकांकडे असलेल्या कौशल्याचा वापर गुरुकार्य अधिकाधिक चांगले होण्यासाठी कसा करायचा ?’, हे शिकवले.