१. यजमान स्नानगृहात चौपाईवरून घसरून पडणे; परंतु गुरुदेवांच्या कृपेने त्यांना कुठेही दुखापत न होणे
‘११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ब्रह्मोत्सव साजरा करण्यात आला. त्या दिवशी आम्हाला घरातील कामे लवकर आवरून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जायचे होते. सकाळी माझे यजमान (श्री. किशोर रामचंद्र घाटे, वय ७४ वर्षे) अंघोळीला गेले. तेव्हा आम्ही घरातील स्वच्छता करत होतो. तेवढ्यात मला एकदम काहीतरी पडल्याचा आवाज ऐकू आला. तेव्हा माझी मुलगी (योगिता घाटे) म्हणाली, ‘‘आई, बहुतेक बाबा स्नानगृहात पडले असावेत.’’ मी घाबरून त्यांना हाक मारली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘होय, मी पडलो आहे. मला उठता आले की, स्नानगृहाचे दार उघडतो.’’ नंतर त्यांनी दार उघडले. स्नानगृहातील चौपाईवरून (स्टुलावरून) ते एकाएकी घसरून खाली पडले होते. त्यांना कुठेही दुखापत झाली नव्हती. गुरुदेवांच्या कृपेनेच ते वाचले.
२. दुचाकीने जात असतांना मोठ्या अपघातातून वाचणे
नंतर आम्ही दुचाकीने रामनाथी आश्रमात जायला निघालो. तेव्हा घरातून बाहेर पडल्यावर कोपर्यावर एक चारचाकी गाडी उभी होती. आम्ही तेथून दुचाकीने जाणार, त्याच क्षणी चालकाने गाडी मागे घेतली. आम्ही अक्षरशः क्षणात पुढे गेलो, नाहीतर आमचा मोठा अपघात होऊन आम्हाला रुग्णालयात न्यावे लागले असते.
वरील दोन्ही प्रसंगांत गुरुदेवांनी आमच्यावर कृपा केली आणि आम्ही वाचलो. त्यामुळे आमच्याकडून सतत कृतज्ञता व्यक्त होत होती. आम्ही आश्रमात महाप्रसाद ग्रहण केला आणि नंतर ब्रह्मोत्सवाच्या ठिकाणी सुखरूप पोचलो.
‘देवा, आमच्याकडे कृतज्ञता व्यक्त करायला शब्दच नाहीत. ‘तू आमचे रक्षण केलेस आणि आम्हाला पूर्ण कार्यक्रम निर्विघ्नपणे पहाता आला’, याबद्दल आम्ही तुझ्या चरणी कृतज्ञ आहोत.’
– सौ. माधवी किशोर घाटे (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ६९ वर्षे), फोंडा, गोवा. (११.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |