Pannun Announce Reward : कंगना राणौत यांना थोबाडीत मारणार्‍या शीख महिला शिपायाला खलिस्तानी आतंकवादी पन्नू याच्याकडून ८ लाख रुपयांचे बक्षीस घोषित !

नवनिर्वाचित खासदार कंगणा रणौत व महिला शिपाई कुलविंदर कौर

वॉशिंग्टन (अमेरिका) – खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने भाजपच्या नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्री असलेल्या कंगणा रणौत यांना थोबाडीत मारणार्‍या कुलविंदर कौर या महिला शिपायाला १० सहस्र अमेरिकी डॉलरचे (८ लाख ३४ सहस्र रुपयांचे) बक्षीस देण्याची घोषणा केली.

कुलविंदर कौर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या शिपाई असून त्या चंडीगड विमानतळावर तैनात असतांना त्यांनी खासदार कंगणा यांच्या थोबाडीत मारली होती.

खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू

दुसरीकडे कंगना राणौत यांच्या थोबाडीत मारल्याने कुलविंदर कौर हिला १ लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याचे पंजाबच्या मोहालीतील व्यावसायिक शिवराज सिंह बैंस यांनी घोषित केले आहे. (अशांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे ! पंजाबमधील आम आदमी पक्षाचे सरकार असे करणार नाही, हेही तितकेच खरे ! – संपादक)

शेतकर्‍यांना ‘खलिस्तानी’ म्हटल्याने मारले थोबाडीत !

कुलविंदर कौर हिने थोबडीत मारल्यावर म्हटले होते की, देहलीच्या सीमेवर शेतकर्‍यांनी केलेल्या आंदोलनाच्या वेळी कंगना रणौत यांनी ‘आंदोलनकर्त्या महिला १०० रुपये देऊन बसल्या होत्या’, असे विधान केले होते. तसेच शेतकर्‍यांना ‘खलिस्तानी’ संबोधले होते. यामुळेच मी कंगना यांना थोबाडीत मारली.

संपादकीय भूमिका

सुरक्षायंत्रणांमध्येच सुरक्षेला धोकादायक असणारे भरती झालेले असणे देशासाठी धोकादायकच होय ! इंदिरा गांधी यांच्या संदर्भात एक अनुभव देशाने घेतलेला आहे, हे पहाता याविषयी अधिक सतर्क होण्याची आवश्यकता आहे !