१ जून या दिवशी ‘जागतिक पालक दिन’ झाला. त्या निमित्ताने एक लिखाण वाचनात आले. त्यात म्हटले होते, ‘‘माझी धाकटी कन्या न्यूयॉर्कला आणि धाकटा मुलगा शिकागोला असतो. माझा मोठा मुलगा आणि सूनबाई टोरंटोला असतात. माझी मोठी मुलगी आणि जावई पॅरिसला असतात.’ अरे वा ! छान ! तुम्ही भाग्यवान आहात ! तुम्ही कुठे असता ?’ ‘मी वृद्धाश्रमात असतो.’’ हा संदेश जागतिक पालक दिनाच्या निमित्ताने सर्वत्र प्रसारित झाला. या संदेशात दिल्याप्रमाणे सर्वच मुले जर विदेशात असतील, तर मग पालकदिन साजरा कोण करणार ? हा संदेश प्रातिनिधिक असला, तरी त्यातील आशय महत्त्वपूर्ण आहे; कारण आज सर्वत्र वरीलप्रमाणेच स्थिती आहे. मुले देश-विदेशात नोकरी किंवा व्यवसाय करतात आणि वृद्ध पालक मात्र घरात किंवा वृद्धाश्रमात राहून त्यांचे उर्वरित आयुष्य मुलांच्या आठवणीत व्यतीत करत असतात. मुलांना मात्र आई-वडिलांशी देणे-घेणे नसते. वर्षातून केवळ एकदा किंवा दोनदा ते आई-वडिलांना भेटण्यासाठी येतात, त्यांना पैसे पुरवतात. काही मुले विदेशात असल्याने त्यांना तसेही भेटणे शक्य नसल्याने ते पैशांची ‘ऑनलाईन’ माध्यमातून व्यवस्था करून मातृ-पितृ ऋण फेडण्याचा (?) तोंडदेखला प्रयत्न करतात. असे का होते ? कारण आजच्या मुलांना स्वतःचे कर्तव्य आणि दायित्व यांची पुरेशी जाण नाही. अनेक ठिकाणी आई-वडिलांना ‘डस्बिन’ (कचरा) संबोधले जाते. अशी मुले पालकांचा सांभाळ कसा करणार ? सर्वत्र असणार्या विभक्त कुटुंबपद्धतीचाही हा परिणाम आहे.
ज्या आई-वडिलांनी आपल्याला लहानाचे मोठे केले, आपल्याला घडवण्यासाठी मेहनत घेतली, अशांची आपण त्यांच्या म्हातारपणी काळजी घ्यायला नको का ? ज्यांच्या कुशीत आपण ममत्व आणि आपुलकी यांची ऊब अनुभवली, त्या ऊबेची आज त्यांनाही आवश्यकता आहे. ती आपण नाही तर कोण देणार ? परमात्म्याने ज्या आई-वडिलांच्या पोटी आपल्याला जन्माला घातले, त्यांच्या समवेत आपला देवाणघेवाण हिशोब असतो. त्यांच्याशी असलेले प्रारब्ध याच जन्मात फेडले, तरच आपण मातृ-पितृ ऋणातून मुक्त होऊ.
सध्याचे पालक त्यांच्या आई-वडिलांची कशी काळजी घेतात ? त्यांना कसे जपतात ? कशी वागणूक देतात ? हे नवी पिढी पहात असते. त्यांच्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण करत असते. ‘आजी-आजोबांना वृद्धाश्रमात टाकणार्या आपल्या आई-वडिलांची सोयही तेथेच करायची असते’, असा (कु)संस्कार त्यांच्या मनात जर निर्माण झाला, तर तेही अयोग्च ठरेल. आपले भवितव्य धोक्यात येऊ नये, यासाठी पालकांनी आपापल्या पालकांची घरीच योग्य काळजी घेऊन आयुष्यातील शेवटचा काळ त्यांच्या समवेत आनंदात व्यतीत करावा आणि नव्या पिढीवर कर्तव्यपूर्तीचे संस्कार करावेत !
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.