पाकिस्तानने आतंकवादी रशीद आणि खलिस्तानी समर्थक अमृतपाल यांचे सूत्र केले होते उपस्थित !
वॉशिंग्टन – भारताच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल लागले आहेत. यामध्ये खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंह याने पंजाबच्या खदूर साहिब मतदारसंघातून विजय मिळवला आहे, तर आतंकवादी शेख अब्दुल रशीद (अभियंता रशीद) हा काश्मीरच्या बारामुल्ला मतदारसंघातून विजयी झाला आहे. हे दोघेही आतंकवादाच्या आरोपाखाली कारागृहात आहेत. त्यांच्या विजयात पाकिस्तानने विशेष रस घेतला आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांना पत्रकार परिषदेत एका पाकिस्तानी पत्रकाराने, ‘भारतातील निवडणुकीतील नकारात्मक भागाकडे बहुदा अमेरिकेने दुर्लक्ष केले आहे. या निवडणुकीत विजयी झालेले खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंह आणि काश्मीरमधून निवडून आलेले अब्दुल रशीद यांच्या विजयाकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने पहाता ?’, असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देतांना प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, ‘आम्ही भारताच्या अंतर्गत निवडणूक किंवा राजकीय सूत्रे यांवर भाष्य करणार नाही.’ पाकिस्तानी पत्रकाराने काश्मीरमधील निवडणुकीचे सूत्रही उपस्थित केले होते. त्यालाही अमेरिकेने प्रतिसाद दिला नाही.
संपादकीय भूमिकापाकिस्तानचे आर्थिक दिवाळे वाजले आहे. तरीही तेथील राजकारणी, जनता आणि पत्रकार यांना स्वतःच्या देशातील समस्यांकडे गांर्भीयाने पहाण्याऐवजी भारतातील घटनांमध्येच अधिक स्वारस्य आहे, हेच दिसून येते. अशा देशाला कोणतीही दयामाया न दाखवता जन्माची अद्दल दाखवणे आवश्यक ! |