Maha Kumbh 2025 : महाकुंभमेळा : शौचालये, विद्युतीकरण, वाळू सपाटीकरण आदी कामे अद्यापही अपूर्ण !

प्रशासनापुढे मोठे आव्हान !

प्रयागराज, ७ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभस्थळी विविध आखाड्यांचे साधू आणि लाखो भाविक आले आहेत; मात्र येथील शौचालये, पाणी व्यवस्था, विद्युतीकरण, वाळूचे सपाटीकरण ही महत्त्वाची कामे अद्यापही प्रलंबित आहेत. १३ जानेवारीपासून महाकुंभाला प्रारंभ होणार आहे. एका आठवड्याहूनही अल्प दिवस शिल्लक असून या कालावधीत ही कामे पूर्ण करण्याचे प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे.

१. शौचालयांची स्थिती !

तात्पुरत्या शौचालयांची ‍व्यवस्था करतांना सरकारी कामगार

कुंभमेळ्याच्या क्षेत्रात प्लास्टिकची तात्पुरती लाखो शौचालये उभारण्यात येत आहेत. शौचालयांची संख्या अधिक असल्याने विविध खासगी आस्थापनांना यांचा ठेका देण्यात आला आहे; मात्र शौचालये उभारण्याची कामे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. शौचालयांतील मळ जाण्यासाठी वाळूमध्ये खड्डे खणून ३ सहस्र लिटरच्या टाक्या बसवण्यात येत आहेत. संबंधित आस्थापनांकडून टाक्यांमधील मळ नियमित रूपाने नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

२. अनेक आखाड्यांना वीज, तसेच पाणी जोडणी झालेली नाही !

वीज खांब उभारतांना सरकारी कामगार

अद्यापही अनेक आखाड्यांना वीज उपलब्ध झालेली नाही. वीजेचे खांब उभारण्याचे काम चालू आहे. वाळूत खड्डा खणून वीजेचे खांब उभारण्यासाठी यंत्रांचा उपयोग केला जात आहे. प्रत्येक यंत्राद्वारे दिवसाला १५० खांब उभारले जात आहेत; मात्र अद्यापही सहस्रावधींच्या संख्येत खांब उभारणे शिल्लक आहे. काही आखाड्यांना पाणी उपलब्ध झालेले नाही. वाळूमध्ये लोखंडी पाईप टाकून त्यांना पाणीपुरवठा करण्याचे कामही चालू आहे.

३. अन्य अपूर्ण कामे !

गंगेच्या तीरावर अनेक ठिकाणी अद्यापही वाळूच्या सपाटीकरणाची कामे चालू आहेत. हे सपाटीकरण पूर्ण झाल्यावरच त्यावरील पुढील व्यवस्था करता येणार आहे. कुंभमेळ्यात प्रवेशासाठी असलेली महाद्वारे उभारणे, तात्पुरत्या पोलीस चौक्या उभ्या करणे, भिंतींचे रंगकाम ही कामे अद्यापही चालू आहेत. ही सर्व कामे येत्या आठवड्याभरात पूर्ण करणे हे प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे.