Anita Anand and George Chahal : भारतीय वंशाच्या अनिता आनंद आणि जॉर्ज चहल यांचे नाव पंतप्रधानपदाच्या चर्चेत !

कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांचे त्यागपत्र

डावीकडून जॉर्ज चहल आणि अनिता आनंद

ओटावा (कॅनडा) – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पंतप्रधानपदाचे त्यागपत्र दिल्यानंतर लिबरल पक्षाच्या अध्यक्षांना नवीन नेता आणि पंतप्रधानपदासाठी व्यक्ती निवडण्यास चालू केले आहे. सध्या तरी नवीन नेता निवडेपर्यंत ट्रुडो पंतप्रधानपदावर रहाणार आहेत. लिबरल पक्षाने परराष्ट्रमंत्री मेलानी जोली, डॉमिनिक लेब्लँक, मार्क कानी अशी अनेक नावे आहेत जी ट्रुडो यांची जागा घेऊ शकतात. लिबरल पक्षाच्या सर्वोच्च नेत्याची निवड करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले जाते. या प्रक्रियेला अनेक महिने लागतात. सध्या भारतीय वंशाच्या अनिता आनंद आणि जॉर्ज चहल यांचे नाव पंतप्रधानपदासाठी चर्चेत आहे.

१. अनिता आनंद माजी मंत्री आहेत. अनिता यांचे पालक भारतातील तमिळनाडू आणि पंजाब राज्यांतील आहेत. आनंद यांना राजकारणाचा खूप अनुभव आहे. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी पुष्कळ चांगले काम केले. यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली होती. भारतीय वंशाच्या लोकांमध्येही त्यांची चांगली प्रतिमा असल्याचे मानले जाते.

२. लिबरल खासदार जॉर्ज चहल हेदेखील कॅनडाचे पंतप्रधान होऊ शकतात. चहल अधिवक्ता म्हणून प्रसिद्ध आहेत. ते नैसर्गिक साधनसंपत्तीविषयी निर्णय घेणारी स्थायी समिती आणि शीख कॉकसचे (गटाचे) अध्यक्षदेखील आहेत. चहल अलीकडच्या काळात ट्रुडो यांच्यावर टीका करत आले आहेत.