मंगेशी (गोवा) येथे युवती संमेलन
फोंडा – ‘कुटुंब प्रबोधन गतीविधी’च्या वतीने मंगेशी येथे युवतींसाठी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात फोंडा आणि तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात युवती सहभागी झाल्या होत्या. युवतींची सद्यःस्थिती, त्यांच्यासमोर असलेली आव्हाने आणि त्यांनी स्वतःच्या प्रगतीसाठी करायच्या उपाययोजना यांसाठी वेगवेगळ्या सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराच्या आरंभी सर्व सहभागी युवतींना कुंकू लावून त्यांचे स्वागत करण्यात आले. समाजात वेगळा ठसा उमटवलेल्या ८ युवतींचा या वेळी सत्कार करण्यात आला. व्याख्यात्या, प्रसिद्ध मुलाखतकार आणि निवेदिका असलेल्या सौ. श्रुती हजारे यांनी ‘आजची युवती, उद्याची गृहिणी’ या विषयावर मार्गदर्शन केले. सौ. हजारे यांनी ‘युवतींनी कुणाला आदर्श मानावे ? स्वतःची मानसिक स्थिती उत्तम रहाण्यासाठी काय करावे ? सद्यःस्थितीत घडत असलेल्या ‘लव्ह जिहाद’च्या घटना, स्वतःची सुप्त शक्ती ओळखून कुटुंब एकत्रित बांधून ठेवण्यासाठी करायचे प्रयत्न’, या विषयांवर प्रबोधन केले.
सौ. श्रुती हजारे म्हणाल्या, ‘‘सद्यःस्थितीत युवतींनी ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणार्यांपासून सावध रहावे. आपल्या संगतीचा परिणाम आपले विचार आणि आचार यांवर होत असतो. त्यामुळे युवावस्थेत युवतींनी योग्य संगतीत रहाणे अत्यावश्यक आहे. मानसिक स्वास्थ्य चांगले रहाण्यासाठी आई, बहीण, मैत्रिणी यांच्याकडे मन मोकळे करावे. मन संतुलित ठेवण्यासाठी स्वतःचे निरीक्षण करणे, मन मोकळे करणे, इतरांचे मार्गदर्शन घेणे, स्वतःच्या कामांचा आढावा घेणे, यांसारखे उपाय कृतीत आणावेत.’’