I.N.D.I Guarantee Card : मुसलमान महिला ‘हमीपत्रा’साठी पोचल्या उत्तरप्रदेशातील काँग्रेसच्या मुख्यालयात !

महिला आणि तरुण यांना वार्षिक १ लाख रुपये देण्याचे काँग्रेसने निवडणुकीत दिले होते आश्‍वासन !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर दुसर्‍याच दिवशी उत्तरप्रदेशची राजधानी लक्ष्मणपुरीमध्ये (लखनौमध्ये) नवे दृश्य पहायला मिळाले. ५ जूनच्या सकाळपासूनच मोठ्या संख्येने मुसलमान महिलांनी उत्तरप्रदेश काँग्रेस पक्ष कार्यालयाबाहेर हमीपत्राची (‘गॅरंटी कार्ड’ची) मागणी करण्यास प्रारंभ केला. इतकेच नाही, तर अनेक महिलांनी आधीच मिळालेले काँग्रेसचे हमीपत्रही नाव, पत्ता आणि क्रमांक भरून पक्ष कार्यालयात जमा केले. काही महिलांचा दावा आहे की, हमीपत्र भरून सादर केल्यानंतर त्यांना काँग्रेस कार्यालयातून पावतीही मिळाली आहे.

मुसलमान महिलांनी सांगितले की, निवडणूक प्रचाराच्या वेळी काँग्रेसने पैसे देण्याचे आश्‍वासन दिले होते, इंडि आघाडी (काँग्रेस आणि त्याचे मित्र पक्ष) चांगली कामगिरी केली आहे; म्हणून आम्ही हमीपत्र घेण्यासाठी आलो आहोत.


काय आहे काँग्रेसचे हमीपत्र ?

काँग्रेसने तिच्या निवडणूक घोषणापत्रात दिलेल्या आश्‍वासनांचा उल्लेख ‘हमीपत्रा’मध्ये केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ३ एप्रिल या दिवशी  नवी देहलीतील पक्षाच्या कार्यालयातून या मोहिमेस प्रारंभ केला होता. या हमीपत्रात ‘युवा न्याय योजने’च्या अंतर्गत प्रत्येक सुशिक्षित तरुणाला वार्षिक १ लाख रुपये आणि ‘नारी न्याय योजने’च्या अंतर्गत गरीब कुटुंबातील प्रत्येक महिलेला वार्षिक १ लाख रुपये देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. याखेरीज ‘मनरेगा’ची (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेची) प्रतिदिन किमान ४०० रुपये मजुरी देण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते. त्याच वेळी स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारसीवर आधारित किमान हमी भावाच्या कायदेशीर हमीसह शेतकर्‍यांना कर्जमाफीचे आश्‍वासन दिले आहे. या हमीपत्रामध्ये नाव, वय, घरातील मतदारांची संख्या, पत्ता, भ्रमणभाष क्रमांक अशी माहिती भरण्यासाठी जागा ठेवण्यात आली आहे. तसेच ‘क्युआर् कोड’देखील दिला आहे. घरोघरी जाऊन हमीपत्रांचे वाटप करण्याचे दायित्व काँग्रेस कार्यकर्त्यांना देण्यात आले होते. आता निवडणुका संपल्यानंतरही काँग्रेसचे कार्यकर्ते लोकांमध्ये हमीपत्रांचे वाटप करत आहेत.

संपादकीय भूमिका 

काँग्रेसच्या याच हमीपत्रामुळे मुसलमानांनी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने भाजपचा उत्तरप्रदेशात पराभव झाला, असे म्हटल्याच चुकीचे ठरू नये ! याचाच अर्थ पुन्हा एकदा मुसलमानच काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिले आहेत, हे हिंदूंनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे !