सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर (वय ९० वर्षे) यांना नामजपाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी

१. अथांग आणि कठीण असा भवसागर पार करतांना नामजपच तारू शकणे

१ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी नावाड्याला समुद्राच्या दुसर्‍या किनार्‍यावर असलेल्या सद्गुरु कुवेलकरआजींच्या कुटुंबियांना घेऊन येण्यास सांगणे

१ अ १. नावाड्याने प्रथम श्री. मनोज कुवेलकर यांना घेऊन येणे : ‘४.४.२०२४ या दिवशी मी नामजप करत असतांना मला एक दृश्य दिसले. त्यात मला एक अथांग समुद्र दिसत होता. त्या समुद्राच्या एका किनार्‍याला मी आणि प.पू. डॉ. आठवले बसलो होतो. समुद्राच्या दुसर्‍या किनार्‍याला माझा मोठा मुलगा श्री. मनोज (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), धाकटा मुलगा श्री. नागराज (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि सून सौ. रूपा नागराज कुवेलकर होते. प.पू. गुरुदेवांनी एका नावाड्याला सांगितले, ‘‘समोरच्या किनार्‍यावर जाऊन तिथे असणार्‍या तिघांना एकेक करून या किनार्‍यावर घेऊन ये.’’ त्याप्रमाणे तो नावाडी समोरच्या समुद्रकिनार्‍यावर गेला. आरंभी त्याने मनोजला बोलावून नावेत घेतले आणि तो मनोजला घेऊन आमच्याकडे आला. ते या किनार्‍यावर आल्यावर प.पू. गुरुदेवांनी मनोजला हात दिला आणि त्याला त्यांच्या बाजूला बसवले.

१ अ २. दुसर्‍या मुलाला नावेतून आणतांना नाव हलू लागणे आणि मुलाने नामजप केल्यावर नाव शांत होऊन इकडे येता येणे : नंतर तो नावाडी पुन्हा नाव घेऊन समोरच्या समुद्रकिनार्‍यावर गेला. त्यांनी नागराजला नावेत घेतले आणि इकडच्या किनार्‍यावर यायला निघाला; पण निघतांना नाव जोराने हलायला लागली. तेव्हा नागराजने मोठ्याने ‘परम पूज्य, परम पूज्य..’, असा नामजप करायला आरंभ केला. नागराजने नामजप चालू केल्यावर ती नाव शांत झाली. नावाड्याने नागराजला आम्ही बसलो होतो, त्या किनार्‍यावर आणले. प.पू. गुरुदेवांनी नागराजला हात देऊन नावेतून बाहेर घेतले आणि आमच्याजवळ बसवले.

१ अ ३. सूनेला नावेतून आणतांना अनेक अडचणी येणे; पण तिने नामजप केल्यावर तीही इकडे सुखरूप पोचणे : नंतर नावाडी सून सौ. रूपा हिला आणायला नाव घेऊन गेला. सौ. रूपा नावेतून थोडे पुढे आल्यावर वादळ चालू झाले आणि नाव जोराने हलायला लागली. तेव्हा सौ. रूपाने मोठ्याने ‘परम पूज्य, परम पूज्य..’, असा नामजप चालू केला. तेव्हा वादळ शांत झाले. अजून थोडे पुढे गेल्यावर २ मगरी नावेच्या समोर येऊन भांडायला लागल्या. त्यामुळे नाव जोराने हलायला लागली. तेव्हाही सौ. रूपाने ‘परम पूज्य, परम पूज्य..’, असा धावा चालू केला. तेव्हा त्या मगरी तिथून निघून गेल्या. तिथून काही अंतर पुढे गेल्यावर लाकडाचे ओंडके नावेच्या समोर आले. त्यामुळे नावेला पुढे जाता येत नव्हते. सौ. रूपाने पुन्हा ‘परम पूज्य, परम पूज्य..’, असा नामजप करायला आरंभ केल्यावर ते लाकडाचे ओंडके नावेसमोरून बाजूला झाले. मग सौ. रूपाने या किनार्‍यावर येईपर्यंत ‘परम पूज्य, परम पूज्य..’, हा नामजप चालूच ठेवला. सौ. रूपा या किनार्‍यावर पोचल्यावर प.पू. गुरुदेवांनी तिला हात देऊन नावेतून बाहेर घेतले आणि आमच्याजवळ बसवले.

त्यानंतर मला जाग आली. यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ‘या अथांग आणि कठीण भवसागरातून नामजपच आपल्याला तारून नेऊ शकतो.’

२. स्वप्नामध्ये घरात एका स्त्रीची पावले उमटलेली दिसणे आणि ‘ती पावले लक्ष्मीची असून तुमच्या घरी लक्ष्मीचा वास आहे’, असा आवाज ऐकू येणे

१०.४.२०२४ या दिवशी मी नामजप करत असतांना मला एक दृश्य दिसले. त्यात मला आमच्या घरात एका स्त्रीची पावले उमटलेली दिसली. ‘ती पावले कुणाची आहेत ? आणि कुठून आली आहेत ?’, हे मला कळत नव्हते. ते पहाण्यासाठी मी घराबाहेर जाऊन पाहिले. मला ती पावले आमच्या घराच्या दिशेने आलेली दिसली. ती पावले आम्ही रहात असलेल्या आमच्या खोल्यांमध्येही उमटली होती. ‘ही पावले कुणाची आहेत ?’, असा विचार करतांना एक आवाज आला, ‘ही पावले लक्ष्मीची असून तुमच्या घरी लक्ष्मीचा वास आहे.’ हे ऐकल्यावर मला जाग आली.

३. स्वप्नामध्ये स्वतःची डावी आणि उजवी दोन्ही बाजू न दिसणे, यातून ‘तुम्ही निर्गुणाच्या शेवटच्या टप्प्यात पोचला आहे’, असे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगणे

३.५.२०२४ या दिवशी मी नामजप करत असतांना मला एक दृश्य दिसले. त्यात मला माझी पूर्ण उजवी बाजू दिसत नव्हती. मी मनोजला या दृश्याविषयी विचारले. तेव्हा तो म्हणाला, ‘‘आज तुम्हाला नामजप करतांना एक बाजू दिसत नव्हती. तुम्हाला जेव्हा दुसरी बाजूही दिसणार नाही, तेव्हा समजायचे, ‘तुम्ही निर्गुणाच्या शेवटच्या टप्प्यात पोचला आहात.’’ दुसर्‍या दिवशी नामजप करतांना मला माझ्या दोन्ही बाजू दिसत नव्हत्या. मला केवळ माझा चेहराच दिसत होता. याविषयी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘आपली डावी बाजू म्हणजे प्रारब्धाची बाजू आणि उजवी बाजू म्हणजे कार्याची बाजू आहे. तुम्हाला दोन्ही बाजू दिसल्या नाहीत, म्हणजे तुमचे प्रारब्ध आणि पृथ्वीवरील कार्य दोन्ही संपले आहे. तुम्ही निर्गुणाच्या शेवटच्या टप्प्यात पोचला आहात.’’ याविषयी मी सूक्ष्मातून प.पू. गुरुदेवांना विचारल्यावर त्यांनीही सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितल्याप्रमाणेच सांगितले.

४. घरही निर्गुण स्थितीत जाणे

१२.५.२०२४ या दिवशी मी नामजप करत असतांना मला एक दृश्य दिसले. त्यात मला माझे घर दिसून ‘घरामध्ये मी नामजप करत बसले आहे’, असे दिसले. नामजप करत असतांना थोड्या वेळाने मी माझ्या घरासह वर-वर जायला लागले. तेव्हा मला वाटले, ‘माझे घरही निर्गुण स्थितीमध्ये गेले आहे.’

– सद्गुरु (श्रीमती) प्रेमा नारायण कुवेलकर, कवळे, फोंडा, गोवा. (१३.५.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक