कळंबा कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढणारा प्रकार !
कोल्हापूर – कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांच्या दोन गटांमध्ये झालेल्या मारहाणीत एका बंदीवानाची हत्या झाली आहे. मुन्ना तथा महंमद अली खान तथा मनोजकुमार भवरलाल गुप्ता (वय ७० वर्षे) असे त्याचे नाव आहे. तो वर्ष १९९३ च्या बाँबस्फोटातील आरोपी होता. तो १२ वर्षांपासून कारागृहात होता. महंमद अली खान आणि अन्य ५ जणांमध्ये झालेल्या हाणामारीत खानच्या डोक्यात भुयारी गटारीवरील लोखंडी झाकण मारून त्याची हत्या करण्यात आली. (कोल्हापूर येथील कारागृहात हत्येसारख्या घटना घडणे, हे पोलिसांना लज्जास्पद आहे ! बाहेर गुंडगिरी करणार्यांना पकडून कारागृहात टाकल्यानंतरही ते तेथे अशाच प्रकारची कृत्ये करू शकत असतील, तर कारागृहातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती किती दयनीय आहे, हेच आपल्या लक्षात येते ! – संपादक)
कळंबा कारागृहात केल्या काही महिन्यांपासून भ्रमणभाष, तसेच अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात सापडले होते. यात काही पोलीस अधिकार्यांचे स्थानांतरही झाले होते. या घटना होत असतांना बंदीवानाच्या हत्येमुळे कळंबा कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत.