तळवडे (ता. राजापूर) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचन
राजापूर, १ जून (वार्ता.) – आपली इच्छा नसतांनाही जीवनात दुःख येत असते. आपल्याला आनंद हवा असतांनाही आपण सुख-दुःखाच्या चक्रांत दैनंदिन जीवन जगत असतो. दुःख निवारण आणि चिरंतन आनंदप्राप्तीसाठी अध्यात्मशास्त्राप्रमाणे योग्य साधना करायला पाहिजे. साधनेने ईश्वरप्राप्ती करता येते, असे मार्गदर्शन सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले. तालुक्यातील तळवडे येथे सनातन संस्थेच्या वतीने आयोजित प्रवचनात ते बोलत होते. महाराष्ट्रातील प्रथितयश उद्योजकांपैकी पितांबरी उद्योग समुहाचे उद्योजक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी पितांबरी ‘इस्टेट’ आणि कृषी पर्यटन केंद्र या ठिकाणी प्रवचनाचे आयोजन केले होते. या प्रवचनाला पाचल, तळवडे, ताम्हाने परिसरातील नागरिक, तसेच पितांबरी आस्थापनेचे अधिकारी, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सद्गुरु सत्यवान कदम यांचा सन्मान श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी शाल आणि श्रीफळ देऊन केला. सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करून श्री. प्रभुदेसाई यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा परिचय कुडाळ येथील साधक श्री. राजेंद्र पाटील यांनी करून दिला. रत्नागिरी जिल्हा सत्संगसेवक, तसेच चार्टर्ड इंजिनीयर श्री. गोविंद भारद्वाज यांनी ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचन दिले आणि उपस्थितांचे शंकानिरसन केले. श्री. भारद्वाज यांचे स्वागत पितांबरी इस्टेटचे कार्यकारी अधिकारी श्री. माधव पुजारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रणव मुळे यांनी केले. कार्यक्रमाला पितांबरी इस्टेटचे व्यवस्थापक श्री. राहुल प्रभुदेसाई, श्री. सुभाष प्रभुदेसाई, ताम्हाने येथील श्री. संतोष चव्हाण, सनातन संस्थेचे श्री. श्रीकृष्ण नारकर, श्री. चिंतामणी रबसे उपस्थित होते.
ईश्वराच्या अनुसंधानात राहिल्याने अचूक निर्णय घेता येतात ! – रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योग समुह
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी सांगितलेल्या गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने जीवनामध्ये आनंद प्राप्त करता येतो. साधनेने ईश्वराच्या अनुसंधानात रहाता येते. ईश्वराच्या अनुसंधानात असल्याने तोच योग्य ते सुचवतो, दिशा देतो, त्यामुळे अचूक निर्णय घेता येतात. जीवनात सर्वच क्षेत्रांत गुरुकृपेने यश मिळते. प्रत्येकाने साधना करून आपले जीवन आनंदी करण्यासाठी या सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे.