१. चेन्नई येथून सेवा करून आल्यावर अकस्मात् प्रकृती बिघडणे
‘१६.११.२०२४ या दिवशी चेन्नई येथून सेवा करून कांचीपूरम् येथे आल्यावर अकस्मात् माझी प्रकृती बिघडली. घरी आल्यावर कणकण येऊन डाव्या बाजूचे अर्धे डोके प्रचंड दुखू लागले. त्यामुळे काहीही सुचेनासे होऊन मला दिवसभर विश्रांती घ्यावी लागली. हाच त्रास पुढे ८ दिवस होत होता. वेदना होत असतांना कधी डोके, कधी दाढ, तर कधी कानामध्येही वेदना होत होत्या. त्यामुळे ‘दुखणे नेमके कशामुळे आहे ?’, त्याचे कारण आणि डोकेदुखीचे मूळ कारण स्पष्ट होत नव्हते.
२. आधुनिक वैद्यांना दाखवूनही निदान न होता वेदना आणि त्रास तसाच चालू रहाणे
आधी दातांमध्ये वेदना चालू झाल्याने दातांच्या रुग्णालयात जाऊन आलो; पण तिथे काहीच अडचण नसल्याने ‘दातांमुळे वेदना होत आहेत’, हे निदान चुकीचे ठरले. त्यानंतर कानाच्या आधुनिक वैद्यांकडे गेल्यावर त्यांनीही पूर्ण तपासून पाहिल्यावर कानांमध्येसुद्धा काहीच त्रास नसल्याचे सांगितले. त्यानंतर सर्वसाधारण आधुनिक वैद्यांकडे गेल्यावर त्यांनी तपासल्यावर त्यांनीही काही त्रास नसल्याचे सांंगितले. ‘पुन्हा नेमक्या कशामुळे वेदना होत आहेत ?’, ते मला कळेनासे झाले होते.
३. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी अग्नीचे उपाय करणे
१० दिवस झाल्यावर वेदना न्यून न झाल्यामुळे शेवटी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी देवघरात लावलेल्या दिव्यातील तेल कपाळावर लावले. असे २ दिवस केल्यावर तिसर्या दिवशी महर्षींना (पू. डॉ. ॐ उलगनाथनजी यांच्या माध्यमातून) विचारले, ‘यांचा त्रास न्यून होत नसल्यामुळे काय उपाय करू शकतो ?’ त्या दृष्टीने महर्षींनी (पू. डॉ ॐ उलगनाथनजी यांच्या माध्यमातून) पुढील उपाय सांगितले, ‘झोपतांना स्वतःभोवती दर्भाचे मंडल काढणे, एका पांढर्या कापडामध्ये वाळा गुंडाळून उशीखाली ठेवणे आणि जास्वंदीचे फूल पाण्यात घालून प्रतिदिन त्याचे पाणी पिणे. तसेच एका पातेल्यात दोन कप पाणी घेऊन त्यात जास्वंदीचे फूल, गोकर्णाचे फूल आणि अर्जुन वृक्षाच्या सालीचे चूर्ण घालून ते पाणी गरम करणे. ते पाणी एक कप होईपर्यंत उकळणे आणि ३ दिवस ते पाणी पिणे.’
४. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केलेले तेलाचे उपाय आणि महर्षींनी सांगितलेलेे उपाय केल्याने लगेच आजारपणाचे निदान होऊन हळूहळू आजारपण न्यून होणे
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी २ दिवस केलेले उपाय आणि महर्षींनी सांगितलेले उपाय चालू केल्यावर तिसर्या दिवशी आधुनिक वैद्यांकडेे गेल्यावर त्यांनी ‘आजारपण ‘साईनस इन्फेक्शन’मुळे झाले आहे’, असे सांगितले. आधुनिक वैद्यांनी दिलेले औषध चालू करण्याआधीच डोकेदुखी न्यून झाली आणि त्रासही बर्यापैकी न्यून झाले.
५. ‘आजारपण कशामुळे आले असावे ?’, असे महर्षी (पू. डॉ ॐ उलगनाथनजी यांच्या माध्यमातून) यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलेली लीला
‘आजारपण कशामुळे आले असावे ?’, असे महर्षी यांना (पू. डॉ ॐ उलगनाथनजी यांच्या माध्यमातून) विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘श्री. स्नेहल राऊत यांना आलेला ज्वर हा उकिरड्यावर बसलेल्या किड्यामुळे आलेला आहे. श्री. स्नेहल राऊत यांनी कांचीपूरम् सोडून सध्या घरी जाऊ नये. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या सान्निध्यात राहिल्याने सर्व ताप दूर होतील. श्री. स्नेहल राऊत यांना सध्या काही विश्रांतीची आवश्यकता होती.’ नेमके त्या वेळी मला वाटत होते की, ‘इथेे माझ्याकडून काही सेवा होत नाही; म्हणून ‘मी गोव्यात रामनाथीला जाऊ का ?’, असे विचारावे.
त्या वेळी माझ्या लक्षात आले की, ‘आपल्या जीवनामध्ये जे काही घडत असते, ते आपल्याला वाटते की, आपल्यामुळेच आहे; पण त्यामागचा कार्यकारणभाव आपल्याला कळत नाही; कारण तेवढी आपली क्षमता नसते. महर्षींच्या कृपेमुळे सर्व सामान्यांनाही त्यांच्या कृपेचा आणि त्यांनी सांगितलेले उपाय करण्याचे भाग्य लाभते.’
– श्री. स्नेहल मनोहर राऊत, तिरूवन्नमलई, कांचीपूरम्, तमिळनाडू. (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ३८ वर्षे) (१३.१२.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |