डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांच्‍या ठिकाणी साधकांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणे

डॉ. (सौ.) कुंदा आठवले

१. सौ. अश्‍विनी मिलिंद जोशी, पनवेल, रायगड.

‘२४.९.२०२४ या दिवशी डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांची नेत्रचिकित्‍सा करण्‍याचे ठरले होते. त्‍यानुसार त्‍यांच्‍या समवेत राहून आवश्‍यकतेनुसार ‘हवे-नको’ ते पहाण्‍यासाठी त्‍यांच्‍या सेवेत रहाण्‍याची संधी मला मिळाली. माटुंगा येथील डॉ. कामदार यांच्‍याकडे डॉ. (सौ.) कुंदाताई नेत्र तपासणीसाठी जातात.

१ अ. डॉ. (सौ.) कुंदा आठवले बोलत असतांना त्‍यांची कांती लखलखीत होऊन त्‍यांच्‍या ठिकाणी साधिकेला परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणे : डॉ. (सौ.) कुंदाताईंच्‍या डोळ्‍यांमध्‍ये इंजेक्‍शन देणार होते. त्‍यासाठी ताईंना ‘गाऊन’ आणि ‘सर्जिकल कॅप’ घालून शस्‍त्रक्रियागृहाच्‍या बाहेर बसवले होते. त्‍या वेळी तिथे आम्‍ही दोघीच होतो. नेहमीप्रमाणेच दादा (प.पू. रामानंद महाराज) आणि बाबा (प.पू. भक्‍तराज महाराज) यांच्‍या कृपाशीर्वादाचे महत्त्व सांगत असतांना अचानकपणे डॉ. (सौ.) कुंदाताईंच्‍या चेहर्‍यावर मला पालट जाणवू लागला. त्‍यांची कांती लखलखीत झाली होती. मला त्‍यांच्‍या चेहर्‍यावर पुष्‍कळ तेज जाणवले आणि दुसरा चेहरा समोर आला जो ओळखीचा होता. पुढच्‍याच क्षणी मला परात्‍पर गुरु डॉ. आठवले समोर दिसू लागले. मला सौ. ताईंचे पुटपुटणे ऐकू येत होते; पण काहीच आकलन होत नव्‍हते. ‘मी रामनाथीला कशी काय आले ? समोर प.पू. डॉक्‍टर कसे ?’, असा संवाद माझ्‍या मनात स्‍वतःशीच चालू होता.

१ आ. डॉ. (सौ.) कुंदाताईंनी साधिकेला आलेली अनुभूती सरूपतेची असल्‍याचे सांगून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे आशीर्वाद तिला मिळाल्‍याचे सांगणे 

सौ. अश्‍विनी जोशी

तो क्षण वेगळाच होता. भानावर येऊन माझा आणि सौ. ताईंचा पुढील संवाद झाला.

मी : ताई, तुम्‍ही काय बोलत आहात मला कळत नाही. आता तुम्‍ही परात्‍पर गुरु डॉक्‍टरांसारख्‍याच दिसत आहात. आधी मला तुम्‍हाला नमस्‍कार करू दे. (मी वाकून नमस्‍कार केला.)

डॉ. (सौ.) कुंदाताई : ‘हरि ॐ तत्‍सत् ।’

आता माझ्‍या डोळ्‍यांतून अश्रूधारा वहात होत्‍या.

डॉ. (सौ.) कुंदाताई : तुला ती मुक्‍ती माहिती आहे नं !

मी : हो ताई ! सरूपता !

डॉ. (सौ.) कुंदाताई : तसेच आहे हे ! आधीपण एकदा कुणीतरी मला असे म्‍हणाले होते. मी प.पू. डॉक्‍टरांना सांगितले होते, ‘अश्‍विनी आहे माझ्‍यासमवेत.’ तेव्‍हा प.पू. डॉक्‍टर म्‍हणाले होते, ‘ती आहे, तर ठीक आहे.’ बहुधा तुझे विचार पोचले त्‍यांच्‍यापर्यंत. त्‍यांनीच तुला आशीर्वाद दिला.

ही अतिशय मोठी अनुभूती आहे. तिचा उलगडा प्रत्‍यक्ष प.पू. गुरुमाऊलीनेच केला. मी मनापासून त्‍यांची ऋणी आहे. ‘या ऋणांतून मुक्‍त होण्‍यासाठी मला अधिक साधना करता येवो’, असा कृपाशीर्वाद सदैव मिळावा’, अशी डॉ. (सौ.) कुंदाताई आणि परात्‍पर गुरु डॉक्‍टर यांच्‍या चरणी प्रार्थना !’

‘त्‍या वेळी छायाचित्र (फोटो) काढणे योग्‍य नव्‍हते’, हे मला त्‍याच क्षणी जाणवले; म्‍हणूनच जे संमिश्र, तसेच एकरूपतेचे रूप समोर दिसले, ते डोळे भरून न्‍याहाळले.’

(२४.९.२०२४)

२. श्री. संजय एकनाथ सावंत (वय ६१ वर्षे), पनवेल

श्री. संजय सावंत

२ अ. डॉ. (सौ.) कुंदाताई आठवले खोलीत येत असतांना त्‍यांच्‍या ठिकाणी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणे : ‘१.६.२०२४ या दिवशी डॉ. (सौ.) कुंदाताई डॉ. मिलिंद जोशी यांच्‍या पनवेल येथील निवासस्‍थानी आल्‍या होत्‍या. मी बैठक खोलीत (हॉलमध्‍ये) बसलो होतो. डॉ. (सौ.) कुंदाताई आतल्‍या खोलीतून बैठक खोलीत (हॉलमध्‍ये) आल्‍या. तेव्‍हा ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर स्‍वत: बाहेर आले आहेत’, असे मला जाणवले.’ (१.१०.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक