पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्‍या आजारपणात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी नामजपादी उपाय करतांना केलेले मार्गदर्शन 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी मानवाला व्‍याधींवर मात करता येण्‍यासाठी प्राणशक्‍तीवहनातील अडथळे शोधणे आणि हाताच्‍या बोटांच्‍या मुद्रा अन् नामजप करणे, हे शिकवणारी उपायपद्धत शोधली. पू. (श्रीमती) निर्मला दाते या सध्‍या गंभीर आजारी (बेशुद्ध) असून त्‍यांच्‍यावर आधुनिक वैद्य औषधोपचार करत आहेत. याचसमवेत स्‍वतःची प्राणशक्‍ती अत्‍यल्‍प असतांनाही सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींसाठी नामजपादी उपाय शोधून दिले, तसेच अन्‍य साधकांना उपाय सांगून त्‍यांच्‍याकडून उपाय करवून घेतले. या वेळी त्‍यांनी साधकांच्‍या प्रश्‍नांना दिलेले उत्तरे येथे देत आहोत.

पू. (श्रीमती) निर्मला दाते

१. प्रश्‍न : मृत्‍यूयोगामध्‍ये अडथळा कोण आणू शकते ? शरिराची क्षमता संपते कि ते प्रारब्‍ध असते ?

उत्तर : मृत्‍यूयोगात हृदयाची क्षमता न्‍यून झाली की, हृदयविकाराचा झटका (Heart attack) येतो. फुप्‍फुस आणि आतडे यांची क्षमता न्‍यून होते. पू. दातेआजींच्‍या संदर्भात प्राणशक्‍तीवहन संस्‍थेची क्षमता थोडी न्‍यून झाली; म्‍हणून अडथळा आला.

२. प्रश्‍न : ‘एखाद्याचा मृत्‍यू झाल्‍यावर यमदूत त्‍याला न्‍यायला येतात, त्‍याला चित्रगुप्‍तासमोर उभे करतात आणि त्‍याच्‍या पाप-पुण्‍याचा हिशोब होतो. त्‍यानंतर त्‍याला पाप भोगावे लागते’, असे वाचले आहे. ६० टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे साधक जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतून मुक्‍त होतात, असे आहे, तर ते स्‍वर्गाच्‍या पुढे जातात. त्‍यांचे पाप-पुण्‍य त्‍यांना भोगावे लागतेच ना ?

उत्तर : पाप-पुण्‍य पुष्‍कळ अल्‍प झाल्‍यामुळेच ते ६० टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठतात. त्‍यांचे साध्‍या माणसांसारखे, म्‍हणजे २० टक्‍के पातळीच्‍या व्‍यक्‍तीचे जसे असते, तसे पाप-पुण्‍य नसते.

सौ. ज्‍योती दाते

३. प्रश्‍न : संतांचे कसे असते ? पू. दातेआजींना त्रास भोगावे लागतात; पण त्‍या संत असल्‍याने ‘त्‍यांचे देह आणि मृत्‍यू यांकडे लक्ष नाही’, असे वाटते.

उत्तर : संतांच्‍या शरिरावर परिणाम होतो; पण त्‍याचा त्‍यांच्‍या मनावर काही परिणाम होत नाही. सर्वसामान्‍य व्‍यक्‍तीचे मन दुःख भोगते. संतांच्‍या संदर्भात त्‍यांचे शरीर भोगते; पण मनाला काहीच जाणीव नसते.

४. प्रश्‍न : पू. आजींची स्‍वतःची काहीच इच्‍छा नाही, तर आपण उपाय केल्‍यावर जे परिणाम दिसतात, ते ईश्‍वरेच्‍छेनेच आहेत का ?

उत्तर : हो.’

५. प्रश्‍न : पू. आजींनी डोळे उघडल्‍यावर आपण त्‍यांना विचारता की, तुम्‍हाला देव दिसत आहे का ? त्‍यांना कोणता देव दिसत आहे ? त्‍या विशिष्‍ट देवलोकात आहेत का ?

उत्तर : पू. आजींना विचारा की, डोळे उघडल्‍यावर त्‍यांना प्रकाश दिसतो कि अंधार ? आधी प्रकाश दिसेल, मग तो प्रकाश कोणत्‍या देवतेचा आहे, ते दिसेल.

६. प्रश्‍न : आता आपण पू. आजींच्‍या उपायांचे घंटे न्‍यून करत आहोत, तर आता त्‍यांची स्‍वतःची ऊर्जा निर्माण होत आहे का ?

उत्तर : हो. हळूहळू उपायांचे घंटे उणावून आपण उपाय थांबवू.

७. प्रश्‍न : सौ. मधुवंती पिंगळे यांना पू. दातेआजींच्‍या संदर्भात ज्‍या अनुभूती आल्‍या, तसेच पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी सांगितले की, पू. आजी त्‍यांच्‍याशी सूक्ष्मातून बोलल्‍या कि मी वेगवेगळ्‍या लोकांत जाऊन आले, हे कसे होते ? पू. आजी यांचा स्‍थूलदेह येथेच असतो. त्‍या वेळी त्‍यांना तिकडच्‍या अनुभूती येतात किंवा पू. आजी वेगवेगळ्‍या लोकांत जाऊन येतात, हे कसे ? पू. आजी सूक्ष्मदेहाने तेथे जाऊन येतात का ?

उत्तर : हो. त्‍यांना स्‍थूलदेहाचे येथे काय चालले, हेही ठाऊक असते.

प्रश्‍न : एका ग्रंथात वाचले होते, त्‍याप्रमाणे पू. आजींचा स्‍थूलदेह आणि सूक्ष्मदेह रूपेरी धाग्‍याने (‘सिल्‍व्‍हर कॉर्ड’ने) जोडलेला असतो. असे असते का ?

उत्तर : हो.

– सौ. ज्‍योती दाते (पू. आजींची सून, आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के, वय ६० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.७.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक