कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यात काळिमा फासणार्या घटना घडत आहेत. ‘उडता पंजाब’ सारखे ‘उडता पुणे’ म्हणण्याची वेळ आली आहे. पुणे येथील कल्याणीनगर अपघात प्रकरणात रक्त फेकून देण्यापर्यंतची मजल ससून रुग्णालयातील आधुनिक वैद्यांनी गाठली आहे. त्यामुळे पुण्याचे रक्त पिऊन मोठे झालेल्या डॉ. अजय तावरेंना भर चौकात फाशी द्यायला हवी, अशी मागणी पुणे येथील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले, ‘‘पुणे येथे मुले शिकण्यासाठी येतात. इतर शहरांतून येणार्या पालकांचे काळजीपोटी चौकशी करणारे दूरभाष येत आहेत. त्यामुळे पुण्यात येणार्या युवकाच्या रक्षणासाठी मी रस्त्यावर उतरणार आहे. पुण्यातील ‘पब’ विकृती थांबली पाहिजे. पोलीस त्यांचे काम योग्य करत नाहीत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.’’