पुरुषांमध्ये मूत्राशयाच्या खालच्या भागात ‘प्रोस्टेट’ नावाची ग्रंथी असते. वयाच्या चाळीशी नंतर स्त्रियांप्रमाणेच पुरुषांमध्ये सुद्धा संप्रेरकांचे पालट होत असतात. प्रोस्टेट ग्रंथीची वाढ होणे, ही वयाच्या चाळीशी नंतर पुरुषांमध्ये आढळणारी एक समस्या आहे. याची वाढ होण्याचे नेमके कारण अद्याप सांगता येणे शक्य नाही; परंतु वाढत्या वयानुसार संप्रेरकांचे पालट हे एक कारण मानले जाते. या ग्रंथीची वाढ झाल्यास काय लक्षणे निर्माण होतात ? ही वाढ सामान्य आहे कि कर्करोगाची वाढ आहे ? यासाठी वेळीच वैद्यकीय साहाय्य घेणे का आवश्यक आहे ? हे या लेखातून आपण समजून घेणार आहोत.
१. प्रोस्टेट ग्रंथीची वाढ झाल्यावर उद्भवणार्या समस्या
मूत्राशयाच्या खालच्या भागात ही ग्रंथी असल्याने तिची वाढ झाल्यावर मूत्र वाहून नेणार्या नलिकेवर दाब पडतो. त्यामुळे लघवीच्या समस्या आढळून येतात.
अ. वारंवार लघवीला जावे लागणे. थेंब थेंब लघवीला होणे. प्रारंभीला रात्री अधिक वेळा जावे लागते. नंतर हा त्रास वाढल्यास दिवसाही ही समस्या उद्भवते.
आ. लघवीला जाऊन आल्यावर सुद्धा पुन्हा लघवी करावीशी वाटणे. लघवीला जाण्याची घाई होते.
इ. मूत्राशयात लघवी तुंबते. त्यामुळे मूत्रमार्गाचा जंतूसंसर्ग होणे, मूतखडा होणे अशा समस्या उद्भवतात. तीव्रता वाढल्यास मूत्रपिंड निकामीही होऊ शकते.
लघवीची समस्या उद्भवल्यास वेळीच वैद्यकीय साहाय्य घ्यायला हवे. विविध वैद्यकीय चाचणी केल्यावर या आजाराचे निदान सहज होऊ शकते. ही वाढ सामान्य आहे कि कर्करोगजन्य आहे ? यासाठी रक्त आणि लघवी यांच्या काही चाचण्या कराव्या लागतात. प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग सामान्यतः त्या ग्रंथीपुरता मर्यादित असतो. क्वचितच या कर्करोगाची वाढ मूत्राशय, मूत्रवाहिनी आणि मूत्रमार्ग यांच्याकडे होऊ शकते.
२. प्रोस्टेट ग्रंथीसंबंधी शल्यकर्माची आवश्यकता
प्रोस्टेट ग्रंथीची वाढ ही कर्करोगाशी संबंधित नसून सामान्य असेल, तर औषधोपचाराने हा त्रास आटोक्यात ठेवता येतो; परंतु औषधोपचाराचा उपयोग होईनासा होतो, तेव्हा आणि लघवी मूत्राशयात पुष्कळ अधिक प्रमाणात तुंबून रहात असल्यास शल्यकर्माद्वारे ही वाढ रोखली जाते. दुर्बिणीच्या साहाय्याने हे शल्यकर्म केले जाते. वरकरणी सोपे वाटणारे शल्यकर्म असले, तरी काही वेळेला शल्यकर्मानंतर अतीरक्तस्त्राव होऊ शकतो. या आजारात मुख्यत्वे रुग्ण आजाराकडे दुर्लक्ष करतो. शल्यकर्माची आवश्यकता असतांना फक्त औषधोपचारच करत राहिल्यामुळे विविध समस्या वाढतात आणि आरोग्यास धोका उद्भवतो. तेव्हा जागरूकतेने आपल्या लक्षणाकडे दुर्लक्ष न करता त्यावर वेळीच उपाययोजना करायला हवी.
३. प्रोस्टेट ग्रंथीचा त्रास न होण्यासाठी पाळावयाचे नियम
प्रोस्टेट ग्रंथीचा त्रास होऊ नये आणि त्रास झाल्यास औषधांच्या व्यतिरिक्त पुढील गोष्टी पाळाव्यात.
अ. जेवणात जुने धान्य असावे. पचेल एवढ्याच प्रमाणात जेवावे. पुष्कळ मसालेदार, आंबवलेले पदार्थ, दही, कुळीथ (हुलगे), दुधाचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करावेत.
आ. योगासने नियमित करावीत. विशेषतः पद्मासन, वज्रासन, उष्ट्रासन, सूर्यनमस्कार नियमित करावेत. प्राणायामामध्ये अनुलोम-विलोम प्राणायाम आणि नाडी शुद्धी प्राणायाम आवर्जून करावा.
इ. अजून महत्त्वाचे, म्हणजे मूलबंध करणे. शरीर स्थिरतेकरता शरिरातील अवयवांचे आकुंचन-प्रसारण या नैसर्गिक क्रिया ज्यात घडून येतात त्या क्रियेला बंध म्हणतात. मूलबंध, जालंधर बंध आणि उडडीयान बंध असे ३ प्रकारचे बंध आहेत.
वरीलपैकी मूलबंध केल्याने बर्याच व्याधींमध्ये लाभ होतो. मूळव्याध, बद्धकोष्ठता, चेहर्यावर सुरकुत्या येणे, तसेच भूक वाढणे, रक्ताची शुद्धी होणे हे या बंधाचे लाभ आहेत. यामध्ये पद्मासन घालून किंवा मांडी घालून बसावे. गुदप्रदेशातील स्नायूंचे वरच्या बाजूला आकुंचन करून २-४ सेकंद संकुचित ठेवावे आणि नंतर सोडावे. यामध्ये मूलस्थानचे बंधन होते; म्हणून याला ‘मूलबंध’ म्हणतात. अशी आकुंचन-प्रसारण क्रिया ४-५ वेळा करावी. सरावाने संख्या वाढवत नेऊ शकतो. साधारण
३० सेकंदामध्ये हा बंध होतो. ही कृती करतांना घाई वा अतिरेक करू नये आणि शांत चित्ताने करावे. तसे न केल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. बंध हा योग प्रकार असल्याने जाणकार व्यक्तींकडून शिकून घ्यावा. यामुळे ओटीपोटात असणार्या स्नायूंना बळ मिळते आणि परिणामी तेथील अवयवांचे स्वास्थ्य टिकून रहाते.
– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे. (२८.५.२०२४)