तुर्भे जनता मार्केट येथे फेरीवाल्यांसह दुकानदारांचे अतिक्रमण !

फेरीवाल्यांचे अतिक्रमण (संग्रहित छायाचित्र )

नवी मुंबई – तुर्भे जनता मार्केट येथे फेरीवाल्यांसह दुकानदारांनी अतिक्रमण केले असून अग्नीशमन नियमांचेही उल्लंघन केले आहे. तसेच वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. येथे हार्डवेअर, गृहोपयोगी वस्तू, कपडे आणि इतर वस्तूंची मोठी बाजारपेठ आहे. काहींनी महापालिकेचे पदपथ आणि गटार येथेही दुकाने थाटलेली आहेत. त्यामुळे येथील मार्गिका अरुंद झाल्या आहेत. फेरीवाल्यांची संख्याही वाढली आहे.

काही वर्षांपूर्वी दिवाळीत येथे लागलेल्या आगीमध्ये जवळपास पाच दुकाने जळून खाक झाली होती. यात अग्नीशमन नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे उघड झाले होते; मात्र अद्यापही याची पूर्तता येथील अनेक व्यापार्‍यांनी केलेली नाही. भविष्यात मोठी दुर्घटना होऊन जीवित आणि वित्त हानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पादचारी पुलावरही बाजार भरला जातो. या फेरीवाल्यांकडून सिद्धू नावाचा करार पद्धतीने काम करणारा कामगार हप्ता जमा करतो. अशा प्रकारांमुळे फेरीवाले आणि दुकानदारही उद्दाम झाले आहेत.

संपादकीय भूमिका 

महानगरपालिका प्रशासनाला हे दिसत कसे नाही ? अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाई कधी होणार ?