मनुस्मृतीचे दहन करतांना जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र फाडले !

  • कार्यकर्त्याने रोखण्याचा प्रयत्न करूनही आव्हाडांकडून दुर्लक्ष !

  • सर्वत्र जोरदार टीका !

  • प्रकरण अंगलट आल्यावर आव्हाडांकडून क्षमायाचना !

मुंबई, २९ मे (वार्ता.) – शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी २९ मे या दिवशी आंबेडकरी चळवळीत मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महाड येथील चवदार तळ्याच्या ठिकाणी हिंदूंच्या अत्यंत प्रवित्र अशा मनुस्मृति या धर्मग्रंथाचे दहन केले. त्याच वेळी अत्यंत आरेरावीमध्ये उतावीळपणाने मनुस्मृति असे नाव लिहिलेले आणि खाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र असलेले ‘पोस्टर’ (भित्तीपत्रक) फाडले. त्यांच्या सहकार्‍यांनीही ही कृती केली. सामाजिक माध्यमांवरून याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर आता मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. प्रकरण अंगलट आल्यावर या प्रकरणी आव्हाड यांनी क्षमायाचना केली. अनेकांनी त्यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

या वेळी आंबेडकरी चळवळीतील एका कार्यकर्त्याने जितेंद्र आव्हाड यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र फाडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याकडे दुर्लक्ष करून जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे चित्र फाडले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र फाडल्याप्रकरणी आव्हाड यांची क्षमायाचना !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर माझ्याकडून अनावधानाने फाडले गेले. यामागे आमचा कोणताही अन्य हेतू नव्हता. यामध्ये कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी क्षमा मागतो. आम्ही हे जाणीवपूर्वक केले नाही, असे स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिले.

(म्हणे) ‘देशातील सरकार राज्यघटना पालटण्याचे काम करत आहे !’ – आव्हाड

मुसलमानांमध्ये खतना, हलाला, बुरखा आणि आता रहित झालेल्या तलाक या कुप्रथांविषयी आव्हाड यांनी आतापर्यंत कधी ‘ब्र’ ही काढला नाही आणि मनुस्मृतीचा कुठलाही अभ्यास नसतांना ती मात्र ते जाळत आहेत, हे लक्षात घ्या !

हळूहळू संपूर्ण मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळे आपण आताच सावध असले पाहिजे. मनुस्मृतीमध्ये क्षुद्र आणि स्त्रिया यांच्याविषयी घाणेरडे लिखाण केलेले आहे. स्त्रिया मानवजातीत मोडत नाहीत, असे मनूचे म्हणणे आहे. ‘स्त्रिया या केवळ उपभोगासाठी असतात’, असे मनू मानतो. ‘स्त्रियांचा उपभोग घ्या आणि त्यांना सोडून द्या’, असे मनू सांगतो. मनुस्मृतीमधील २ श्‍लोक अभ्यासक्रमात घेतले, तर हळूहळू संपूर्ण ग्रंथाचा अभ्यासक्रमात समावेश केला जाऊ शकतो. देशातील सरकार राज्यघटना पालटण्याचे काम करत आहे. राजकीय लाभासाठी जातीय आणि धार्मिक द्वेष पसरवण्याचे काम चालू आहे.

अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या श्‍लोकात एकतरी चूक दाखवा ! – शिक्षणमंत्री दीपक केसरकर

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या नवीन अभ्यासक्रमाच्या प्रारूपामध्ये वयोवृद्ध, तपोवृद्ध यांचा आदर केल्यामुळे यश, कीर्ती, बळ प्राप्त होते या अर्थाचा श्‍लोक देण्यात आला आहे. विद्यार्थीदशेपासूनच गुणसंवर्धन करण्याविषयी संदर्भ म्हणून हा श्‍लोक देण्यात आला आहे. याविषयी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मनुस्मृतीमधील काही श्‍लोकांविषयी आक्षेप असला, तरी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार्‍या श्‍लोकामध्ये काही आक्षेपार्ह नाही. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या अभ्यासक्रमात यापूर्वीच हा श्‍लोक समाविष्ट करण्यात आला आहे, हे स्पष्ट केले आहे. या वेळी  दीपक केसरकर यांनी ‘या श्‍लोकातील एकतरी चूक दाखवा’ असे आवाहनही केली आहे. असे असतांना भविष्यात अभ्यासक्रमात संपूर्ण मनुस्मृतीचा समावेश करण्यात येईल, असा बागूलबुवा निर्माण करून जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृति जाळण्याचा कार्यक्रम केला.

डॉ. आंबेडकर यांचे चित्र फाडल्याविषयीच्या प्रतिक्रिया

१. अमोल मिटकरी, अजित पवार गट – ही चूक अक्षम्य आहे. त्यांनी राष्ट्राचा अवमान केला आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला पाहिजे. महाडला जाऊन त्यांनी नाक घासून प्रायश्‍चित घेतले पाहिजे.

२. सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक मंत्री – आव्हाड यांच्यावर कारवाई होणे, हे दायित्व सरकारचे दायित्व आहे.

३. भरतशेठ गोगावले, शिवसेना, महाड – स्टंटबाजी करतांना डॉ. आंबेडकरांचा मान राखण्याचे त्यांना भान नव्हते.

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात करणी सेनेकडून तक्रार प्रविष्ट (दाखल) !

जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचे दहन करण्याचे वक्तव्य करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या निषेधार्थ त्यांच्या विरोधात दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याविषयी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवावा आणि त्यांना राज्यातून तडीपार करावे, अशी मागणी करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी एका तक्रारीद्वारे ककेली आहे.

आव्हाड हे हिंदु धर्मात तेढ निर्माण करत आहेत. राज्यात धार्मिक दंगली निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहेत; म्हणून त्यांना त्वरित गजाआड करा, अशी मागणी त्यांनी या तक्रारीत केली आहे.