युद्ध मात्र समाप्त करणार नाही ! – नेतान्याहू
तेल अवीव (इस्रायल) – गेल्या ८ महिन्यांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध चालू झाल्यानंतर प्रथमच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी एका सूत्रावर माघार घेत चूक स्वीकारली. २६ मेच्या रात्री गाझा पट्टीच्या सुरक्षित क्षेत्रातील तेल अल-सुल्तान बचाव छावणीवर झालेल्या इस्रायली आक्रमणात ४५ लोकांच्या मृत्यू झाला. यावरून जगभरातील देशांनी इस्रायलला फटकारले. यामुळे प्रथमच नेतान्याहू यांनी चूक मान्य करत ‘घटना दु:खद आहे’, असे सांगून क्षमा मागितली. असे असले, तरी आमच्या सैन्याचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही, तोपर्यंत युद्ध समाप्त करणार नाही, असेही ते म्हणाले.
१. नेतान्याहू पुढे म्हणाले की, आम्ही राफातून १० लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढले, मात्र तरीही एक दु:खद घटना घडली.
२. इस्रायली सैन्याने सांगितले की, आम्ही हमासच्या चौक्यांवर निशाणा साधला होता. त्यात हमासचे दोन वरिष्ठ कमांडर यासीन राबिया आणि खालिद नेगार यांचा मृत्यू झाला.
३. गेल्या ३ आठवड्यांत राफातून १० लाखांहून अधिक लोक पळून गेले आहेत. या आक्रमणाआधी राफा येथे १४ लाख लोक रहात होते.
४. गाझामध्ये गेल्या २४ घंट्यांत ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३६ सहस्र लोकांचा मृत्यू झाला असून ८१ सहस्र नागरिक घायाळ झाले आहेत.