स्थलांतर केल्यास उद्योग बंद करण्याची उद्योजकांची चेतावणी
डोंबिवली – डोंबिवली एम्.आय.डी.सी.तील ५ घातक उद्योग, तसेच १५६ अतिघातक उत्पादने करणारी रासायनिक आस्थापने स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने तुम्ही सिद्ध आहात कि नाही, याविषयीची संमतीपत्रे अधिकारी भरून घेत आहेत. ही संमतीपत्रे १ दिवसात भरून देण्यासाठी बळजोरीही करण्यात येत आहे. यामुळे उद्योजक संतप्त आहेत.
‘संमतीपत्रे भरून घेण्यापूर्वी डोंबिवलीतील उद्योजकांशी थेट एम्.आय.डी.सी. अधिकारी थेट संवाद का साधत नाहीत ? संमतीपत्रे कुणाकडून दिली जात आहेत ? याचा त्यात स्पष्ट शब्दांत उल्लेख नाही. उद्योजकांना घाबरवण्यासाठी हा प्रकार केला जात आहे का ?’, असे प्रश्न उद्योजक विचारत आहेत.
‘मागील ६० वर्षांपासून आम्ही डोंबिवली येथे आस्थापने चालवत आहोत. आमची सर्व व्यवस्था बसली आहे. अशा परिस्थितीत स्थलांतर करण्यात येणार असेल, तर आम्ही आमचे उद्योग बंद करू’, अशी चेतावणी उद्योजकांनी दिली आहे. ‘या माध्यमातून बेरोजगारीचे नवे संकट उभे राहिले, तर त्याची उत्तरे शासनाने द्यावीत’, असेही उद्योजकांनी सांगितले आहे.
संपादकीय भूमिका :स्फोट होऊन हानी झाल्यावर ही सर्व धांदल करण्यापेक्षा आस्थापनाशेजारी पूर्वीच वसाहती निर्माण होण्यास अनुमती का दिली गेली ? |