‘डेंग्यू’ न होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या ग्रामीण स्तरावर उपाययोजना चालू !

कोल्हापूर, २८ मे (वार्ता.) – लवकरच पावसाळा चालू होत असून ‘डेंग्यू’विषयी आधुनिक वैद्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने गावांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, सर्व पाण्याचे साठे पूर्णत: कोरडे करून स्वच्छ करावेत, निरुपयोगी वस्तू नष्ट करून परिसर स्वच्छ करावा, इमारतीवरील आणि भूमीतील पाण्याच्या टाक्यांमध्ये डास होऊ नये यासाठी घट्ट झाकण बसवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एकूणच ‘डेंग्यू’होऊ नये म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाच्या ग्रामीण स्तरावर उपाययोजना चालू आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी आरोग्याधिकारी डॉ. संजय रणवीर यांनी पत्रकारांना दिली.

डॉ. संजय रणवीर म्हणाले, ‘‘डेंग्यूचा फैलाव जलद गतीने होतो. त्यासाठी नागरिकांना ताप आल्यास तो अंगावर न काढता तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखवून घ्यावे. जानेवारीमध्ये ४७, फेब्रुवारीत ३७, मार्चमध्ये २८, एप्रिलमध्ये ३५, मे मध्ये ३५ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. हा रोग डासांच्या द्वारे वेगाने पसरतो त्यामुळे त्यासाठी नागरिकांचे प्रबोधनही अत्यावश्यक आहे. शाळा चालू झाल्यावर आम्ही विद्यार्थ्यांमध्येही या विषयी प्रबोधन करणार आहोत.’’