सध्या सामाजिक माध्यमावर एक ‘व्हिडिओ’ प्रसारित होत आहे. त्यात एक अगदी लहान वयाचा विद्यार्थी रडत आपल्या शिक्षिकेला सांगत आहे की, त्याचे वडील पोलिसांत आहेत. यावर शिक्षिका त्याला विचारते, ‘‘तुझे वडील पोलिसांत आहेत, तर काय करायचे ?’’ त्यावर तो शिक्षिकेला उत्तर देतो, ‘‘ते तुम्हाला गोळ्या घालतील, बंदूक पेटीच्या वर ठेवली आहे !’’ अशा प्रकारे हा चिमुकला विद्यार्थी भर वर्गात त्याचे वडील पोलीस असल्याचे सांगून शिक्षिकेला चक्क रडत रडत का होईना; पण धमकावतांना दिसत आहे ! यावरून सध्याच्या पिढीची मानसिकता कशी झाली आहे ? हे लक्षात येते. कदाचित ती शिक्षिका त्याला ओरडली असावी; परंतु एवढ्या लहान वयात मुलांची अशी मानसिकता असेल, तर पुढे ही मुले कशी होतील ? ही हिंस्र मानसिकता समाजासाठी अत्यंत धोकादायक आहे. याला वेळीच आवर घालणे आवश्यक आहे.
प्रचलित शिक्षणव्यवस्थेत विद्यार्थी मानसिक रुग्ण बनत चालला आहे. हे वास्तव भविष्याच्या दृष्टीने अधिकच गंभीर आणि चिंताजनक आहे. पूर्वी शिक्षक विद्यार्थ्यांना वळण लावण्यासाठी छडीचा मार द्यायचे. त्याचे त्या विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही काहीच वाटायचे नाही; उलट आपल्या मुलांना वळण लावण्यासाठी पालकांनी शिक्षकांना पूर्ण मुभा दिलेली असायची; पण आता विद्यार्थ्यांना मारल्यास शिक्षकांवर गुन्हेही नोंद केले जातात. त्यामुळे शिक्षकही पोटार्थी झाल्याने मुलांना शिस्त लावणे, संस्कार करणे याकडे ते तळमळीने लक्ष देत नाहीत; किंबहुना तो भाग सोडूनच देतात. वरील प्रसंगामध्ये खरेतर त्या शिक्षिकेने त्या मुलाला योग्य-अयोग्य याची जाणीव करून देणे अपेक्षित आहे; पण ती शिक्षिकाही कदाचित त्या छोट्या विद्यार्थ्याचे मुलाचे उत्तर ऐकून हतबल झाली असेल आणि तिने सध्याच्या आधुनिक परंपरेनुसार या घटनेचा व्हिडिओ सिद्ध करून सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला असेल.
या धावपळीच्या युगात संस्कारक्षम पिढी निर्माण न होण्याची अनेक कारणे आहेत. आई-वडिलांना नोकरीमुळे मुलांकडे लक्ष द्यायलाच वेळ नाही. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे घरात संस्कार करणारे आजी-आजोबाच नाहीत. त्यामुळे मुले लहान असतील, तर पाळणाघरात ठेवली जातात. तेथे त्यांना चांगले-वाईट सांगणारे कुणीही नसते. त्यात केबल टीव्ही, इंटरनेट, ‘व्हिडिओ गेम’, ‘ओटीटी’वरील चित्रपट, वाहिन्यांवरील मालिका, हिंदी किंवा इंग्रजी चित्रपट घरोघरी आल्याने ही आधुनिक साधनेच मुलांच्या कोवळ्या मनावर (कु)संस्कार करतात. नको त्या गोष्टी कोवळ्या वयात हाती आल्यामुळे मुलांची मानसिकता विकृत बनत आहे. पालकांनी मुलांना शिक्षकांचा आणि मोठ्यांचा आदर करणे, त्यांच्याशी नम्रतेने वागणे, त्यांचे ऐकणे आदी गोष्टी शिकवण्याची आवश्यकता आहे, तरच उद्याची नीतीमान पिढी निर्माण होईल !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे