हिंसाचारी आणि निरपराधी यांना ठार मारणार्‍याचा वध करणे, ही अहिंसाच आहे ! – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

हिंसा आणि अहिंसा यांचा विवेक फारच विचारपूर्वक केला पाहिजे. ‘मारणे म्हणजे हिंसा आणि न मारणे म्हणजे अहिंसा’, असा ठोकळेबाज अर्थ घेणे अज्ञानाचे लक्षण आहे. देवळे फोडणे, स्त्रियांची विटंबना करणे आणि निरपराध्यांना ठार मारणे असे करणार्‍याचा वध करणे, ही अहिंसाच आहे. शरिराचा रोग शस्त्रक्रियेनेच बरा होणार असेल, तर शस्त्रक्रिया हिंसायुक्त म्हणून तिच्याकडे नाक मुरडायचे का ?

भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

१. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या अहिंसेची उदाहरणे

अ. छत्रपती शिवाजी महाराजांनी १५ वर्षांच्या तरुणीवर बलात्कार करणार्‍या रांझ्याच्या पाटलाचे हात-पाय तोडले, अफझलखानाचा वध केला, शाहिस्तेखानाची बोटे तोडली, चंद्रराव मोरेचा शिरच्छेद केला. यावरून ‘महाराज हिंसक आणि क्रूर होते’, असे म्हणता येईल का ?

आ. अनेकांच्या छळाला, हिंसेला आणि जुलुमाला कारण होणार्‍याला होणारी शिक्षा सर्वांचे जीवित सुरक्षित रहायला उपयोगी पडते. सहस्रोंची प्रचंड सेना घेऊन महाराष्ट्रभर घुमाकूळ घालीत, देवळे फोडीत, स्त्रियांची विटंबना करत आणि निरपराध्यांना ठार मारत निघालेल्या अफझलखानाचा वध, हाही याच दृष्टीने फार मोठी अहिंसा ठरते.

राजा शिवाजी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याला भेटले आणि त्याचा वध केला. युद्ध झाले असते, तर नाहक सहस्रो मराठे मारले गेले असते.

इ. याच प्रकारे शाहिस्तेखानाचे प्रचंड आक्रमण छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ त्याच्या मुक्कामी मध्यरात्री आक्रमण करून, त्याची बोटे छाटून आणि दहशत निर्माण करून परतवून लावले. यातून महाराजांनी सहस्रावधी मराठ्यांच्या सेनेची हिंसा वाचवली. त्यामुळे शत्रूचा नाश कोणत्याही प्रकारे करणे, हा धर्मच आहे.

ई. महाराजांनी सत्कार्यार्थ केलेली हिंसा वध्यच आहे. प्रसंगी त्यांनी स्वकीयांचीसुद्धा हिंसा केली. सखुजी गायकवाड या सख्ख्या मेहुण्याने एका स्त्रीशी दुष्ट वर्तन केल्याबद्दल महाराजांनी भर दरबारात त्याचे डोळे काढले.

२. हिंसेतून छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण

स्वराज्याचे कंकण बांधून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करतांना महाराजांना उघडपणे सहकार्य नाकारून सत्कार्यात सहभागी न होणारा इतकेच नव्हे, तर अडथळा असणार्‍या चंद्रराव मोरेचा शिरच्छेद केल्याने अनेक सरदार महाराजांच्या हिंदवी राज्य स्थापनेला साहाय्यक झाले. राष्ट्राच्या आपत्तीच्या वेळी, राष्ट्रउभारणीच्या कार्यात सहभागी होणाराच राष्ट्रभक्त असतो. ‘कार्याला आडकाठी करणार्‍याला कापूनच काढले पाहिजे’, हेच जणू महाराजांनी शिकवले.

३. शिशुपालाचा वध श्रीकृष्णाने याच हेतूने केला नव्हता का ? युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञप्रसंगी अपशकून करणारा शिशुपाल वध्यच होता.

४. अहिंसेच्या पुजार्‍यांमुळे राष्ट्राची झालेली हानी

हिंसा-अहिंसेचा विवेक आम्हाला राहिला नाही; म्हणून महंमद बिन कासीमने सिंधवर स्वारी केली. त्या वेळी त्याला आमच्या हिंसावाद्यांनी विजयी केले. हाच प्रकार अहिंसेच्या पुजार्‍यांच्या अंध-अहिंसेपायी पाकिस्तान स्थापनेच्या वेळी भारताला सहन करावा लागला.’

– शेवडेंची अमेरिकेतील प्रवचने (ह्यूस्टन, २१.७.१९८०)