रशियाने त्याच्या देशातील अमेरिकी संपत्ती केली जप्त !

मॉस्को (रशिया) – रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू झाल्यापासून अमेरिका आणि पाश्चात्त्य देशांनी रशियावर अनेक निर्बंध घातले आहेत. यामुळे रशियाची मोठी आर्थिक हानी झाली आहे. यामुळेच रशियाने त्याच्या देशातील अमेरिकी संपत्ती जप्त केली आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या आदेशाने ही संपत्ती जप्त करण्यात आली आहे. याद्वारे रशियाची हानी भरून काढली जाणार आहे.

फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून आतापर्यंत अमेरिका आणि पाश्चात्त्य देश यांनी २४ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची रशियाची संपत्ती जप्त केली आहे. यामुळेच रशियाने अनेक परदेशी गुंतवणूकदारांची मालमत्ता विशेष खात्यांमध्ये हस्तांतरित केली. सरकारच्या संमतीखेरीज ही मालमत्ता रशियाबाहेर पाठवली जाऊ शकत नाही.