Bangladeshi MP Murder In WB : बेपत्ता बांगलादेशी खासदाराची बंगालमध्ये हत्या : ३ बांगलादेशींना अटक

  • कोलकात्यात मृतदेह  सापडला !

  • हत्या पूर्वनियोजित असल्याचा पोलिसांना संशय !

अन्वारुल अझीम अनार

कोलकाता (बंगाल) – भारतात ८ दिवसांपासून बेपत्ता असलेले बांगलादेशाचे खासदार अन्वारुल अझीम अनार यांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. त्यांचा मृतदेह कोलकात्यातील एका सदनिकेत आढळून आला. बांगलादेशच्या गृहमंत्र्यांनीही या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे.

कोलकाता पोलिसांनी सांगितले की, न्यू टाऊन परिसरात खासदार अन्वारुल यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला. या प्रकरणी पोलिसांनी ३ बांगलादेशींना अटक केली आहे. ही पूर्वनियोजित हत्या असल्याचा पोलिसांना संशय आहे.

खासदार अन्वारुल हे वैद्यकीय उपचारांसाठी १२ मे या दिवशी कोलकाता येथे आले होते. दुसर्‍याच दिवशी ते बेपत्ता झाले. अन्वारुल यांचा भ्रमणभाषही १३ मेपासून बंद होता. पोलिसांचे म्हणणे आहे की, त्यांच्या भ्रमणभाषवरून त्यांच्या कुटुंबियांना संदेश पाठवण्यात आला होता की, ते नवी देहलीला निघून गेले आहेत.

कोण होते अन्वारुल अझीम अनार ?

अन्वारुल अझीम अनार हे पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे खासदार होते. त्यांनी वर्ष २०१४, २०१८ आणि २०२४ मध्ये झेनैदह-४ मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती.