राष्ट्रविरोधी भूमिकेप्रकरणी निलंबित विद्यार्थ्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी नाकारली !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – राष्ट्रविरोधी भूमिका आणि गैरवर्तन यांप्रकरणी टाटा समाज विज्ञानसंस्थेने (टिस) २ वर्षांसाठी निलंबित केलेल्या विद्यार्थ्याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी नाकारली आहे. २१ मे या दिवशी न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपिठाने हा निर्णय दिला. न्यायालयाने या याचिकेवर १८ जून या दिवशी सुनावणी ठेवली आहे.

टाटा समाज विज्ञान संस्थेने रामदास के.एस्. याची शिष्यवृत्ती बंद केली आहे. याविषयी अधिवक्ता मिहिर देसाई यांनी न्यायालयात रामदास याची बाजू मांडली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. विद्यार्थ्यांकडून होणार्‍या गंभीर अपप्रकारांच्या कृत्याप्रकरणी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या निर्णयाविरोधात कुणाला आक्षेप असेल तर त्यांनी कुलगुरुंकडे तक्रार करणे हा योग्य उपाय आहे. कुलगुरुंकडे तक्रार केल्याविना याचिकाकर्त्याने थेट उच्च न्यायालयात जाणे योग्य नाही, असे प्रतिज्ञापत्र टाटा समाज विज्ञान संस्थेने न्यायालयात सादर केले आहे.