‘न रहे दादूमिया…’ !

दादूमिया, म्हणजेच डॉ. दामोदर विष्णु नेने यांचे २१ मे या दिवशी निधन झाले. गुजरातमध्ये वर्ष १९२९ मध्ये त्यांचा जन्म झाला. व्यवसायाने आधुनिक वैद्य (प्रसूतीतज्ञ) असून वयाच्या नव्वदीपर्यंत ते त्यांचा व्यवसाय करत होते; परंतु त्यांची खरी ओळख, म्हणजे गेल्या काही दशकांत भारतात हिंदुत्वनिष्ठ लिखाण करणार्‍या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या ज्या काही मोजक्या व्यक्ती होत्या, त्यांपैकी ‘एक’ अशीच करून द्यावी लागेल. ‘दादूमिया’ या टोपणनावाने त्यांनी गेली काही दशके हिंदुत्वाची सत्य बाजू अतिशय परखडपणे, स्पष्टवक्तेपणाने, कुठलीही भीडभाड न ठेवता मांडली; अर्थातच् काँग्रेसच्या राज्यात मांडली. मराठी, इंग्रजी, गुजराती या तिन्ही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यामुळे त्यांच्या हिंदुत्वाच्या लेखणीला व्यापक आयाम मिळाला. हिंदुत्वनिष्ठ शोधपत्रकारिता करणारा एक पत्रकार असे त्यांच्याविषयी म्हटले, तरी फारसे वावगे ठरणार नाही.

दादूमिया

१. नरेंद्र मोदी यांची जडणघडण उलगडणारे पत्रकार !

दादूमिया केवळ हिंदुत्वनिष्ठ पत्रकार किंवा लेखक नव्हते, तर ते हिंदुत्वनिष्ठ विचारवंत होते. पंतप्रधान मोदी ज्या काही अनेक लोकांचे विचार ऐकून घेत असतील, त्यांपैकी एक म्हणजे दादूमिया होते, एवढी त्यांच्या मताला किंमत होती. नरेंद्र मोदी यांची जडणघडण त्यांनी जवळून पाहिली; म्हणूनच त्यांच्यावरचे ‘स्वयंसेवक ते पंतप्रधान’ हा प्रवास ते उलगडू शकले. ‘नरेंद्र मोदी – एक झंझावात’ नावाचे पुस्तक त्यांनी लिहिले.

‘मोदींची ‘हवा’ कायम असली, तरी त्यांच्या जवळच्या लोकांमुळे पुढे काय होईल ? ही भीती वाटते,’ असे सांगायलाही त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. ‘उथळ विधान करणार्‍यांना आवरा’, अशी सूचना मोदी यांना करू शकतील, एवढा त्यांचा अधिकार होता. ‘मोदींचा हेतू पुष्कळ चांगला आहे; पण त्यांना चांगले सहकारी मिळत नाहीत आणि आता विरोधकांनाही बळ येऊ लागले आहे’, असे सांगायलाही त्यांनी कमी केले नाही. ‘मोदींचे मराठमोळे सल्लागार’ म्हणून त्यांची ख्याती झाली. पंतप्रधानांना थेट पत्र पाठवत राहून त्यांच्याकडून कृतीशील उत्तर मिळवून घेत रहाणारा हा अनोखा कृतीशील हिंदुत्वनिष्ठ पत्रकार होता !

 २. तत्त्वनिष्ठ

सौ. रूपाली वर्तक

एक हिंदुत्वनिष्ठ पत्रकार जसा तत्त्वनिष्ठ असतो, तसेच मूलतः ते अत्यंत तत्त्वनिष्ठ होते. पत्रकारितेच्या क्षेत्रात असल्यामुळे त्यांना अनेकांच्या अनेक गोष्टी कळल्या; परंतु त्याचा अपलाभ न उठवता, तीच गोष्ट वेगळ्या अंगाने राष्ट्रहितासाठी कशी उपयोगात आणायची, हे त्यांच्या लक्षात येई आणि ते कृती करत.

देशाच्या जवळजवळ सर्वच पंतप्रधानांची त्यांनी मुलाखत घेतली आहे, हे त्यांच्या दीर्घायुषी पत्रकारितेचे विशेष आहे. अशी संधी मिळालेला देशातील कदाचित् हा विरळा पत्रकार असावा. या सर्वांची विशेषता त्यांनी गुणग्राहकाप्रमाणे त्यांनी टिपली; परंतु त्यांनी त्यांची लेखणी कधी कुणापुढे झुकवली, असे केले नाही.

स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा नंतरही अनेक मोठ्या साम्यवादी नेत्यांशी त्यांचा संपर्क आला. त्यातून ते शिकले आणि नेमके तेवढे घेऊन ते घडत गेले, असे म्हटले तर चूक ठरू नये.

मुसलमानबहुल भागात रहात असल्याने ‘नेने’ नावाचे लिखाण कोण वाचणार; म्हणून त्यांनी ‘दादूमिया’ नाव घेऊन आयुष्यभर हिंदुत्वाचे लिखाण केले. अशी युक्ती योजून राष्ट्रसेवा करणार्‍या या पत्रकाराने एक प्रकारे ही कृष्णनीतीच अवलंबली, असे म्हणू शकतो.

३. भारताच्या सत्य इतिहासाचे पुरस्कर्ते !

दादूमिया यांनी नेहरू, गांधी, काँग्रेस यांच्या चुका आणि ढोंग यांमुळे भारताची जी हानी झाली, त्याविषयी त्यांनी अत्यंत परखडपणे आणि न कचरता लिहिले. ‘गेल्या ६० वर्षांत लिहिला गेलेला विकृत इतिहास म्हणजे गांधी-नेहरू यांच्यावरील अंधप्रेमातून निर्माण झालेले साहित्य !’, असे त्यांनी स्पष्टपणे लिहिले. ‘नेहरू कालखंडाचा पुनर्विचार होऊन त्याचे पुनर्वाचन आणि पुनर्लेखन झाले पाहिजे, तरच नेहरूंच्या लोकशाहीचा बुरखा फाडला जाईल अन् त्यांचा खरा रशियन अवतार लोकांना समजून येईल’, असे त्यांचे म्हणणे होते. ‘नेहरूंनी भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याचे श्रेय सुभाषचंद्रांच्या आझाद हिंद सेनेऐवजी गांधींच्या चळवळीस दिले’, हे लिहायला त्यांना काहीही वाटले नाही.

‘ख्रिस्ती मिशनरी हे धर्मगुरु नसून शिकारी आहेत !’, हे लिहायला त्यांच्या लेखणीने मागे-पुढे पाहिले नाही. दलितांच्या राजकारणाविषयीही त्यांनी मोकळेपणाने लिहिले. ‘बुद्धीवादी ना.ग. गोरे यांनी महाराष्ट्रातील ब्राह्मणहत्येला क्रांती म्हटले होते आणि अत्र्यांचे शिव्या-शाप मिळवले होते !’, यांसारखी वाक्ये त्यांच्या लिखाणातील सत्यान्वेषी रोखठोकपणा दर्शवतात.

४. इतिहासातील बारकावे टिपणारी दृष्टी !

आर्य चाणक्य, विद्यारण्यस्वामी आणि समर्थ रामदासस्वामी या तिन्ही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेमागील कार्यकारण ठरलेल्या महापुरुषांमधील एक भेद त्यांनी सांगितला; तो म्हणजे समर्थ पूर्णतः संन्यासी होते. तिघांनाही राजकारणाची जाण होती; चाणक्य अमात्य पद घेऊन आणि विद्यारण्यस्वामी मंत्रीपद यांनी घेऊन राजकारण केले; परंतु समर्थ मात्र त्यापासून कोसो दूर राहिले; इतकेच काय ते छत्रपतींच्या राज्याभिषेकालाही गेले नाहीत !

५. जनता आणि नेते यांची जाण !

त्यांनी एके ठिकाणी म्हटले होते, ‘भारताची जनता भोळी आहे; पण मूर्ख नाही.’ या विधानावरून त्यांचे परीक्षण आणि निरीक्षण किती योग्य होते, ते लक्षात येते. ‘जनता मोदी यांच्या झोळीत मते फेकेल’, असे वर्ष २०१९ च्या निवडणुकांच्या वेळी त्यांनी अतिशय निश्चयपूर्वक सांगितले होते, यावरून त्यांची राजकारण आणि जनता यांना समजण्याची जाण लक्षात येते. ‘मोदी सोडले, तर सध्या सत्ताधारी आणि विरोधक या दोघांमध्येही एकही ‘उंच’ नेता नाही. बाकीच्यांमध्ये दृष्टी नाही’, असे त्यांचे स्पष्ट मत होते. तेव्हा कदाचित् कुणाला ही अतिशयोक्ती वाटली, तरी आता अनेक जण त्यांच्या या मताशी सहमत होतील, यात शंका नाही.

६. व्यासंग आणि लिखाण

एक पत्रकार म्हणून इंदिरा गांधींच्या व्यक्तीमत्त्वातील वैशिष्ट्येही त्यांनी टिपली होती. वर्ष १९६६ मध्ये त्यांनी इंदिरा गांधी यांच्या समोरच्या आव्हानांचे विश्लेषण करणारे एक पुस्तक लिहिले होते. मोठ्या नेत्यांशी जवळीक आणि मैत्री हे त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे आणखी एक विशेष होते; असे असूनही त्यांचे राहणीमान साधे होते. दादूमिया यांचे आजोबा आणि वडील यांनी बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानात सचिवाचे काम केल्याने, त्यांचा कारभार जवळून पाहिलेल्या दादूमियांनी त्यावर अभ्यासपूर्ण पुस्तके लिहिली. ग.वा. बेहरे यांच्या ‘सोबत’ या साप्ताहिकात त्यांचे स्तभलेखन असे. ‘धर्मभास्कर’, ‘प्रज्ञालोक’ यांसारख्या राष्ट्र आणि धर्म यांना वाहिलेल्या नियकालिकांत त्यांनी पुष्कळ लिखाण केले. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमधूनही त्यांचे लिखाण वेळोवेळी पुनर्प्रसिद्ध केले आहे. त्यांचे ‘एनसायक्लोपीडिया हिंदुस्थानिका’ या सुमारे १६ खंडांच्या इंग्रजी भाषेतील ज्ञानकोशाचे लिखाण चालू होते. हे त्यांच्या हिंदुत्वविचारधारेच्या संशोधन कार्यातील एक महत्त्वाचे योगदान म्हणावे लागेल !

– सौ. रूपाली वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.५.२०२४)

संपादकीय भूमिका 

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेमागील कार्यकारण ठरलेल्या महापुरुषांमधील भेद जाणून त्याप्रमाणे कृतीप्रवण होणारे पत्रकार आज हवेत !