स्वतःच्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मृत्यूविषयीचे मनात विचार आल्यावर ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे बाळासाहेब विभूते यांची झालेली विचारप्रक्रिया !

    देवद येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे बाळासाहेब विभूते (वय ६९ वर्षे) यांचे १४ मे २०२४ च्या सायंकाळी हृदयविकारामुळे निधन झाले. २३ मे या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा दहावा दिवस आहे. त्या निमित्ताने त्यांची विचारप्रक्रिया येथे देत आहोत

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘एकदा ‘माझ्या मृत्यूनंतर किंवा पुढच्या जन्मात माझे गुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले) मला भेटतील का ? तेव्हा मी त्यांना कसा ओळखणार ?’, या प्रश्नाने माझे मन कासावीस होत होते. ‘परात्पर गुरु डॉक्टरांचा मृत्यूयोग आणि स्वतःचा मृत्यू’ यांविषयी मला एक प्रकारची भीती वाटत होती.

१. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या भक्तीसत्संगातून मिळालेली प्रेरणा

श्री. बाळासाहेब विभूते

१ अ. भक्तीसत्संगात गुरूंचा महिमा आत्मीयतने, तन्मयतेने आणि अथक वाणीतून वर्णन करणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ ! : १९.२.२०२२ या दिवशी पहाटे ४.३० वाजता मला अकस्मात् जाग आली. तेव्हा मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची आठवण झाली. ‘त्या भक्तीसत्संगात परात्पर गुरु डॉक्टरांविषयी किती आत्मीयतेने आणि तन्मयतेने सांगतात ! जसे ‘अर्जुनाला केवळ पक्ष्याचा डोळाच दिसायचा’, तसे ‘परात्पर गुरु डॉक्टर’ हा एकमेव केंद्रबिंदू ठेवून त्या अथक अन् ओघवत्या वाणीतून त्यांचा महिमा सत्संगात वर्णन करतात. त्यांचे बोलणे माझ्या हृदयाचा ठाव घेते. त्या गुरुमहिमा-वर्णनाच्या संततधारेत साधकांना न्हाऊ घालत असतात. ‘माझ्या गुरूंचे वर्णन किती करू ? त्यांची ख्याती जगाच्या कानाकोपर्‍यात कशी पोचवू ?’, हा एकच ध्यास त्यांना आहे.

१ आ. ‘जीवनातील प्रत्येक गोष्ट, तसेच घडणारा प्रसंग गुरूंशी कसा जोडायचा ?’, याची गुरुकिल्ली श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगातून देणे : सतत २ ते २.३० घंटे ओघवत्या वाणीत बोलणे अवघड आहे; पण ते शिवधनुष्य श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ सहजतेने पेलतात. त्या वेळी त्यांच्यावर अनिष्ट शक्तींची आक्रमणेही होतात; पण त्यांना न जुमानता त्या सतत बोलत असतात. त्यांचे शब्द कानात गुंजारव करत रहातात आणि ‘आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट आणि घडणारा प्रसंग आपल्या गुरूंशी कसा जोडायचा ?’, याची गुरुकिल्लीच त्या देत आहेत’, हे आठवून माझे मन कृतज्ञतेने भरून आले.

१ इ. समर्थ रामदासस्वामींच्या सत्-शिष्यांप्रमाणे कठोर साधना करण्याचा निश्चय होणे : पूर्वी आपण सत्संगाच्या ठिकाणी लावत असलेल्या पांढर्‍या कापडी फलकावर (‘बॅनर’वर) लाल आणि निळ्या या रंगांत लिहिलेले ‘चांगला साधक कसे बनायचे ?’, हे वाक्य माझ्या डोळ्यांसमोर तरळले. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगांत समर्थ रामदासस्वामींच्या सत्शिष्यांच्या गुरुनिष्ठेविषयी सांगितलेल्या कथा आठवून त्या शिष्यांप्रमाणे साधना करण्याचा माझा निश्चय झाला. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि समर्थ रामदासस्वामी एकच आहेत’, याची मला निश्चिती झाली.

२. ‘गुरूंनी सांगितलेली साधना १०० टक्के क्रियमाण वापरून करायला हवी’, याची जाणीव होणे आणि प्रत्येक प्रसंगात निरपेक्ष रहाण्यावर लक्ष केंद्रित होणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ भक्तीसत्संगांत सांगत असलेली सूत्रे ऐकून ‘पुढच्या जन्मात मला माझे गुरु भेटतील का ? मी त्यांना कसे ओळखणार?’, हे माझे प्रश्न गौण झाले. ‘गुरूंनी सांगितलेली साधना करत रहाणे’, एवढेच क्रियमाण आपल्या हातात आहे. ‘क्रियमाणाचा १०० टक्के वापर करणे’, हीच आपली साधना आहे. त्यासाठी शरीर झिजवून सेवा करण्यासह मनही झिजले पाहिजे’, याची मला तीव्रतेने जाणीव झाली. ‘मनातील अपेक्षा आणि अट्टहास, यांमुळे मनाला क्लेश होतात’, याची मला कल्पना आली आणि ‘प्रत्येक प्रसंगात निरपेक्ष कसे रहाता येईल ?’, याकडे माझे लक्ष केंद्रित झाले.

३. ‘गुरु सर्व परीक्षांत उत्तीर्ण करणार आहेत आणि त्यांच्या चरणांशी ठाव देणार आहेत’, याची निश्चिती होणे

त्या जगन्नियंत्या परमेश्वराने आपल्या जीवनाची रचना ही कर्म-फल न्यायानुसार केलेली आहे. ‘माझ्या जीवनाविषयीची खडा-न्-खडा माहिती माझ्या गुरूंना आहे आणि ते मला सर्व परीक्षांत उत्तीर्ण करणार आहेत. ते मला त्यांच्या चरणांशी ठाव देणार आहेत’, याची मला निश्चिती झाली आणि माझे मृत्यूविषयीचे भय शमले.’

– श्री. बाळासाहेब विभूते (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (वर्ष २०२२)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.