वॉशिंग्टन (अमेरिका) – बांगलादेशाचे माजी सैन्यदल प्रमुख अझीझ अहमद भ्रष्टाचारात गुंतल्यामुळे त्यांच्यावर अमेरिकेकडून निर्बंध लादण्यात आले आहेत. अहमद हे २३ जून २०२१ पर्यंत बांगलादेशाचे सैन्यप्रमुख होते.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले की, माजी जनरल अझीझ अहमद यांच्या भ्रष्टाचारामुळे बांगलादेशातील लोकांचा त्यांच्या देशातील संस्थांवरील विश्वास उडाला आहे. माजी सैन्यदल प्रमुखाने बांगलादेशातील गुन्हेगारी कारवायांसाठीचे दायित्व टाळण्यासाठी स्वतःच्या भावाला साहाय्य केले. त्यांनी सार्वजनिक प्रक्रियेत हस्तक्षेप केला आणि मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला. अझीझ यांनी त्यांच्या भावासह बेकायदेशीरपणे सैन्याची कंत्राटे देण्याचे काम केले. यासह वैयक्तिक लाभासाठी सरकारी नियुक्त्यांच्या बदल्यात लाच घेतली.
अमेरिकेच्या घोषणेवर प्रतिक्रिया देतांना अहमद म्हणाले की, माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. माझ्यावर लादण्यात आलेले निर्बंध दुर्दैवी आहेत.
बांगलादेशातील प्रशासन बळकट करण्यासाठी अमेरिका वचनबद्ध !
बांगलादेशामध्ये लोकशाही संस्था आणि कायद्याचे राज्य सशक्त करण्यासाठी अमेरिका कटीबद्ध आहे, असे मिलर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, ही बंदी या वचनबद्धतेची पुष्टी करते.