बारावीचा निकाल घोषित झालेला नसतांना एका शहरातील काही नामांकित महाविद्यालयांनी विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्या भ्रमणभाषवर संपर्क करून ‘आमच्याकडे प्रवेश घ्या’, अशी विनवणी चालू केली आहे ! हे पूर्वी कधी ऐकले नव्हते. प्रवेश मिळण्यासाठी नेहमी विद्यार्थी धडपडत असतात. आता विद्यापिठांनी स्वतःहून अशा प्रकारे संपर्क करणे, म्हणजे शिक्षणाचे एवढे व्यावसायिकरण झाले आहे. ‘आमचे महाविद्यालय उच्च शिक्षणासाठी किती योग्य आहे’, याची माहिती व्हॉट्सॲपवर पाठवली जात आहे. आपल्या संस्थेत अधिकाधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश व्हावेत, यासाठी ही नामांकित महाविद्यालये आतापासूनच सक्रीय झाली आहेत.
बारावीची परीक्षा संपली की, विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन शिक्षणाविषयी विचारप्रक्रिया चालू होते. असे जरी असले, तरीही परीक्षांचे निकाल लागल्याखेरीज विद्यार्थ्यांना त्यांना आवडणार्या किंवा हव्या असलेल्या क्षेत्रात पुढील शिक्षण घेता येईल, याची निश्चिती नसते. पुढे काय करायचे आहे ? हे ठरवून विद्यार्थ्यांनी वर्षभर कसून प्रयत्न केलेले असतात. या शैक्षणिक संस्थांकडून सातत्याने येणारे संपर्क, संदेश यांमुळे विद्यार्थी आणि पालक त्रस्त झाले आहेत. त्यामध्ये निकालापूर्वीच महाविद्यालयांकडून अशा प्रकारे प्रवेशासाठी दबावतंत्र अवलंबले जाणे अत्यंत क्लेशदायक आहे. निकाल लागण्यापूर्वी काही दिवस विद्यार्थी आणि पालक यांची मनःस्थिती मुळातच काय होईल ? कसे होईल ? या विचाराने अस्थिर झालेली असते. निकालापूर्वीच त्यांच्याकडून येणारे दूरध्वनी, सामाजिक माध्यमांवर येणारे संदेश यामुळे पालकांची आणि विद्यार्थ्यांची मनःस्थिती अधिक प्रमाणात अस्थिर होण्याची शक्यता असते. यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असते. कदाचित घाईत वा दबावाखाली चुकीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. अत्यंत गंभीर अशा या विषयात महाविद्यालयांच्या दडपशाहीची नोंद घेत उच्च शिक्षण विभागाने कारवाई करावी, अशी मागणी पालक करत आहेत. विद्यार्थी आणि पालक यांची वैयक्तिक माहिती सार्वजनिक झाल्यामुळे, महाविद्यालयांना या उपक्रमासाठी त्यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध झाले आहेत. यावरून या प्रकारात शाळा-महाविद्यालयांचे संगनमत आहे का ? अशी शंका येते. या प्रकाराची उच्च शिक्षण विभागाने सखोल चौकशी करणे अपेक्षित आहे. निकाल लागल्यानंतर अशा प्रकरणांमध्ये वाढ होऊन विद्यार्थी आणि पालकांना अधिक मानसिक क्लेश सहन करावे लागू शकतात. महाविद्यालयांनी विद्यार्थी आणि पालक यांना यामुळे काय त्रास होतो ? याचा विचार करायला हवा.
– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.