सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील ३ कर्मचारी निलंबित, तर १ कर्मचारी कार्यमुक्त !

सांगली, १८ मे (वार्ता.) – पाणीपट्टीची देयके न काढल्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील प्रभारी ‘मीटर रिडर’ राजन हर्षद, प्रीतेश कांबळे यांना निलंबित, तर मानधनी कर्मचारी सूरज शिंदे यांना सेवेतून कार्यमुक्त केले आहे. सर्किट हाऊस अंबाईनगर येथील रहिवासी भावेश शहा यांना विनाअनुमती अनधिकृत नळ जोडणी दिल्याप्रकरणी ‘फिटर’ नितीन आळंदे यांना १७ मे या दिवशी निलंबित करण्यात आले आहे. महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी ही कारवाई केली.

राजन हर्षद हे कुपवाड विभागाकडे प्रभारी ‘मीटर रिडर’ म्हणून, तर प्रीतेश कांबळे हे वानलेसवाडी भागाकडे प्रभारी मीटर रिडर म्हणून कार्यरत होते. पाणीपट्टी मागणीची देयके सिद्ध करून संबंधितांकडून वेळेत वाटप करून घेण्याचे दायित्व त्यांच्यावर होते. पाणीपट्टी मागणीची देयक त्यांनी वेळेत काढले नाही. ग्राहकांना देयकांचे वाटप झाले नसल्यामुळे महापालिकेची आर्थिक हानी झाली. कर्तव्यात कसूर केला, असा ठपका ठेवत हर्षद आणि कांबळे यांना सेवेतून निलंबित केले आहे.

कुपवाड विभागाकडील वर्ष २०१९ पासून सर्व रजिस्टर, तसेच नस्ती (अर्ज, प्रस्ताव यांची प्रत धारिकेत ठेवून दोरी बांधणे) पडताळल्या असता मानधनी कर्मचारी सूरज शिंदे यांनी २८५ नळजोडणीची देयके नागरिकांना दिली नसल्याचे निदर्शनास आले. नवीन नळजोडणीच्या नस्ती स्वीकारून पाणीदेयके न काढल्याचे स्वीकृत दर्शनी निदर्शनास आल्याने कार्यकारी अभियंता यांनी खुलासा मागवला होता; मात्र खुलासा आला नाही. त्यामुळे त्यांना मानधन सेवेतून कार्यमुक्त केले आहे. शिंदे यांना फेब्रुवारी २०२४ मध्येही पाणीपट्टी वसुलीत हलगर्जीपणाविषयी कार्यमुक्त केले होते; मात्र ‘माफीनाम्या’नंतर त्यांना मानधनी सेवेत घेतले होते. (पहिल्याच गैरप्रकारच्या वेळी त्यांच्यावर कठोर कारवाई केली असती, तर पुन्हा त्यांनी असा गैरप्रकार केला नसता. – संपादक) त्यांना आता पुन्हा कार्यमुक्त केले आहे.