‘मला ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांच्याशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होणार्या त्यांच्या लेखांविषयी समन्वय करण्याची सेवा आहे. ती करतांना मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.
१. कोणत्याही घटनेसंदर्भात माहिती मांडतांना परिस्थिती प्रत्यक्ष जाऊन पहाणे
ब्रिगेडियर महाजन हे संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी दौरा करत असतात. ‘आतंकवादी कारवाई किंवा दंगलसदृश ठिकाणी तेथील परिस्थिती कशी आहे ?’, हे पहाण्यासाठी ते तिकडे जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतात आणि मग तो अभ्यास सामाजिक माध्यमे अन् वृत्तवाहिन्या यांच्या माध्यमातून मांडत असतात. हल्द्वानी (उत्तराखंड) येथे झालेल्या हिंसाचाराविषयीच्या घटनांच्या संदर्भात माझे त्यांच्याशी फेब्रुवारी २०२४ मध्ये भ्रमणभाषवर बोलणे झाले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘प्रसिद्धी माध्यमांतून मिळणार्या बातम्यांपेक्षा स्थानिक परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे तेथे काय परिस्थिती आहे, हे पहाण्यासाठी मी हल्द्वानीला (उत्तराखंड) आलो आहे.’’
२. देशाच्या सुरक्षेविषयी अखंड विचारमंथन करणे
ब्रिगेडियर महाजन यांच्या बोलण्यात प्रत्येक वेळी देशाच्या सुरक्षेविषयीचे विचार ऐकायला मिळतात. ते सुरक्षेविषयी अखंड चिंतन करत असतात. चीनकडून केली जाणारी कारस्थाने, तसेच गृहयुद्धजन्य परिस्थिती यांविषयी त्यांचा सतत अभ्यास चालू असतो. त्यांच्या लेखांमधूनही हेच विषय आणि त्यांतील विविध बारकावे वाचायला मिळत असतात. ‘देश सुरक्षित रहावा’, अशी त्यांची तीव्र तळमळ असते. त्यांच्या बोलण्यात सहजतेने हे विषय येतात. ‘त्यांनी या विषयांचा पुष्कळ अभ्यास केला असावा’, असे मला जाणवते.
३. नम्रता
सैन्याचे अनेक निवृत्त अधिकारी, तसेच पोलीस अधिकारी यांच्यात पुष्कळ अहं असतो; परंतु ब्रिगेडियर महाजन हे अतिशय नम्र आहेत आणि त्यांचे बोलणेही आदरयुक्त असते.
४. मातृभाषाप्रेम
अनेकदा ते व्याख्याने देतांना मराठीतून संवाद साधतात. अन्य अधिकारी मात्र इंग्रजी भाषेला प्राधान्य देतात.
५. अहं अल्प असणे
ते त्यांनी सैन्यदलात स्वतः दिलेल्या योगदानाविषयी अल्प बोलतात. त्यांच्याकडून ‘व्हॉट्सॲप’च्या माध्यमातून प्रतिदिन किंवा २ – ३ दिवसांनी काही माहिती पाठवली जाते. याविषयीही ‘ही माहिती तुम्हाला पाठवत राहिलो, तर चालेल ना, अडचण असल्यास तुम्ही मला कळवू शकता’, असे त्यांनी मला २ वेळा सांगितले होते. एकदा मी त्यांना एका लेखाविषयी विचारले. त्यांनी तो लेख दैनिक ‘सनातन प्रभात’साठी पाठवला होता. काही दिवसांनी त्यांचा स्वतःहून भ्रमणभाष आला होता. त्या वेळी त्यांनी विचारले, ‘‘माझ्याकडून तो लेख तुम्हाला पाठवला गेला आहे का ? माझ्या नोंदीमध्ये ‘तो लेख अजून पाठवला नाही’, असे आहे.’’ त्या वेळी ‘‘त्यांनी तो लेख पाठवला आहे’’, असे मी त्यांना सांगितले. त्यावर ते म्हणाले, ‘‘ठीक आहे. माझ्याकडून नोंद करायची राहून गेली. त्यामुळे माझ्या लक्षात आले नाही.’’ यातून त्यांची नम्रता शिकायला मिळाली.
६. देशप्रेम आणि देशासाठी त्याग
सध्या ते ‘यू ट्यूब’द्वारे देशाची सुरक्षा आणि त्यासंबंधी विविध विषयांवर मार्गदर्शन करतात. ते ज्या ठिकाणी असतील तेथून माहिती पोचवण्यासाठी प्रयत्न करतात. तेथून त्यांना माहिती पाठवणे शक्य नसल्यास ‘ते ती कधी पाठवू शकतील ?’, हेसुद्धा ते कळवतात. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मधून लेख छापून येत आहेत ना ? किती जण ते लेख वाचतात ?’, याचा पाठपुरावाही ते अधून मधून घेतात. त्यांचा देशाप्रती असलेला त्याग पाहून ‘देश कल्याणासाठीचे आपले स्वतःचे प्रयत्न पुष्कळ वाढवायला हवेत’, याची मला सतत जाणीव होते.
प.पू. गुरुदेव, तुमच्याच कृपेने मला ही सेवा करण्याची संधी मिळाली आहे. या सेवेतून तुम्हीच मला ही सर्व सूत्रे शिकवलीत. याविषयी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. केतन पाटील (वय ३० वर्षे), पुणे (२८.४.२०२४)