१. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया केल्याने सेवेत झालेले लाभ !
१ अ. धर्मप्रेमी आणि युवा साधक यांच्याशी मनमोकळेपणाने सहज बोलता येणे : रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करत असतांना सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांनी ‘प्रतिमा जपणे’ आणि ‘मनमोकळेपणा नसणे’ या माझ्यातील स्वभावदोषांवर माझ्याकडून प्रयत्न करून घेतले. त्यामुळे आता प्रसारात सेवेला गेल्यावर मला धर्मप्रेमी आणि युवा साधक यांच्याशी मनमोकळेपणाने सहज बोलता येते. पूर्वी माझ्या मनावर दडपण असायचे.
१ आ. बोलण्यात सहजता येऊन सेवेतील आनंदही घेता येणे : पूर्वी माझ्या मनात ‘आपल्याकडून काही चुकीचे बोलले जाणार नाही ना ?’, असे स्वतःची प्रतिमा जपण्याचे विचार असायचे. त्यामुळे मी फार अल्प आणि औपचारिक बोलायचो. आता बोलतांना ‘माझ्या समवेत गुरुदेव आहेत’, असा माझा भाव असतो. त्यामुळे मी एकटा धर्मप्रेमींना संपर्क करण्यासाठी गेल्यावरही माझ्या बोलण्यात सहजता असते आणि मला सेवेतील आनंदही घेता येतो.
१ इ. आता धर्मप्रेमीसुद्धा माझ्याशी सहजतेने बोलतात. ते त्यांच्या अडचणी मला सांगतात.
१ ई. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेचे जाणवलेले वैशिष्ट्य : आता मला सहसाधकांशी जवळीक साधता येते. ‘त्यांच्या अडचणी या स्वतःच्या अडचणी आहेत’, असे वाटून मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया म्हणजे गुरुदेवांनी सर्वांची मनपुष्पे जोडण्यासाठी दिलेली दोरीच आहे’, असे मला वाटते.’
२. पू. (सौ.) संगीता जाधव यांनी प्रशिक्षणाच्या सेवेविषयी सांगितलेली सूत्रे आणि त्यानंतर स्वतःमध्ये जाणवलेले पालट
२ अ. सनातनच्या ७४ व्या समष्टी संत पू. (सौ.) संगीता जाधव यांनी प्रशिक्षण सेवेविषयी सांगितलेली सूत्रे
१. स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग घेणार्या साधकांची एकाच वेळी ५० अथवा १०० जणांना हाताळता येईल, अशी प्रशिक्षकाची सिद्धता करून घ्यायला हवी. या दृष्टीने समाजासाठी (प्रशिक्षण करणार्या धर्मप्रेमींसाठी) आणि प्रशिक्षकांसाठी असे दोन्ही प्रकारचे स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग गांभीर्याने घ्यायला हवेत.
२. प्रशिक्षणवर्ग घेणारे साधक आणि प्रशिक्षण करणारे धर्मप्रेमी यांच्यात गांभीर्य निर्माण करायला हवे, उदा. वर्ग चालू असतांना काही धर्मप्रेमींचे तिकडे दुर्लक्ष असते किंवा त्यांचे वेगळे काहीतरी चालू असते. तेव्हा अशा प्रकारच्या चुका त्यांनी टाळायला हव्यात.
३. प्रशिक्षकाची सेवा करणार्या साधकाने त्याच्याकडून या सेवेमध्ये होणारी लहानात लहान चूकही त्यांना मार्गदर्शन करणार्यांना सांगायला हवी.
४. प्रशिक्षक साधकांमध्ये गुणवृद्धी व्हायला हवी. त्यासाठी दायित्व असलेल्या साधकांचे न ऐकणे, निरोप परिपूर्ण न देणे, सेवेचे नियोजन न करणे, समन्वयाच्या चुका, वेळेचे पालन न करणे, अशा प्रकारच्या चुका वर्गात गांभीर्याने घ्यायला हव्यात. यासाठी सर्वांना प्रायश्चित्त आणि शिक्षापद्धत लागू करायला हवी. असे केले, तरच त्या प्रशिक्षकांसाठी गुरुदेवांचा संकल्प कार्यरत होईल.
२ आ. स्वतःमध्ये जाणवलेले पालट
१. आता मी समाजातील प्रशिक्षणवर्गाला वेळेच्या आधी जातो आणि धर्मप्रेमींशी अनौपचारिक बोलतो. त्यामुळे ‘माझी धर्मप्रेमींशी जवळीक होत आहे’, असे माझ्या लक्षात आले.
२. धर्मप्रेमीही प्रशिक्षणवर्गाला वेळेत येऊ लागले आहेत. तेव्हा ‘आपल्या कृतीतून योग्य संदेश गेल्यावर त्याचा चांगला परिणाम होतो आणि धर्मप्रेमीही त्याचे आचरण करतात’, हे मला शिकता आले.
३. आता धर्मप्रेमीसुद्धा स्वतःहून वेळेत येऊन वर्गात श्रीरामाचे चित्र लावणे, इतरांना बोलावणे इत्यादी पूर्वसिद्धतेच्या कृती करू लागले आहेत.
४. सहप्रशिक्षकांना पू. (सौ.) संगीता जाधव यांची मार्गदर्शनपर सूत्रे सांगितल्याने ते स्वतःच्या चुका बैठकीमध्ये मांडू लागले आहेत आणि स्वतःच्या अडचणीही मोकळेपणाने सांगू लागले आहेत.
माझे सर्व प्रयत्न सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या कृपेनेच होत आहेत. त्यांची कृपा नसती, तर मला एक क्षणही समाजात इतरांच्या समोर उभे राहून बोलता आले नसते. तेच मला सर्व करण्यासाठी बळ आणि बुद्धी देत आहेत. यासाठी मी दोघांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. हेमंत पुजारे, मुंबई (२१.८.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |