पत्रकार केतन तिरोडकर यांना अटक !
उपमुख्यमंत्र्यांचे ड्रग्ज माफियांशी संबंध असल्याविषीचे विधान केल्याचे प्रकरण
मुंबई – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्ज माफियांशी संबंध असल्याचे विधान केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेने पत्रकार केतन तिरोडकर यांना अटक केली. केतन तिरोडकर यांनी ‘देवेंद्र फडणवीस ड्रग्ज माफियांवर कठोर कारवाई करत नाहीत’, असाही आरोप केला आहे. न्यायालयाने केतन तिरोडकर यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी दिली असून त्यांना आर्थर रोड कारागृहात पाठवण्यात आले आहे.
विधान परिषदेची शिक्षक आणि पदवीधर निवडणूक पुढे ढकलली
मुंबई – मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाची विधान परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. यापूर्वी ही निवडणूक १० जून या दिवशी घोषित करण्यात आली होती. ही निवडणूक कधी होणार ? याचा दिनांक अद्याप निवडणूक आयोगाने घोषित केलेला नाही. शिक्षक आणि पदवीधर निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, यासाठी न्यायालयात याचिका करण्यात आली होती. शिक्षक भारती पक्षाचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनीही भारत निर्वाचन आयोगाकडे ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती.
त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे ‘स्कायवॉक’ची चाचपणी !
त्र्यंबकेश्वर (जिल्हा नाशिक) – येथे दर्शनासाठी येणार्या भाविकांना थेट मंदिरात जाता यावे, यासाठी बहुमजली वाहनतळापासून मंदिराच्या पूर्व दरवाजापर्यंत ‘स्कायवॉक’साठी चाचपणी करण्यात आली. देवस्थान संस्थान हे नियोजन करत असून यासाठी वास्तूविशारद एजन्सीचीही नेमणूक करण्यात आली आहे. ‘स्कायवॉक’ उभारतांना नागरिकांच्या घरांना अडचण येणार नाही, हे लक्षात घेऊन रेल्वे स्थानकाप्रमाणे फॅब्रिकेटेड मार्ग उभारण्यात येणार आहेत, असे मंदिराचे विश्वस्त आणि माजी नगराध्यक्ष कैलास घुले यांनी सांगितले.
जादूटोण्याची भीती दाखवून महिलेकडून खंडणी उकळली !
पुणे – जादूटोण्याची भीती दाखवून महिलेकडून खंडणी उकळण्यात आली आहे. तक्रारदार महिला वानवडी भागात रहाते. एका परिचिताच्या वतीने ती आरोपींच्या संपर्कात आली होती. घरावर कुणीतरी काळी जादू केली आहे. काळी जादू नष्ट करण्यासाठी विधी करावा लागेल, असे आरोपींनी सांगितले. तसेच यानंतर महिला आणि तिच्या मुलीची छायाचित्रे सामाजिक प्रसारमाध्यमांत प्रसारित करतो, अशी धमकी देऊन आरोपीने महिलेकडून वेळोवेळी पैसे उकळले, तसेच तिच्याकडून दागिने घेतले. या प्रकरणी उत्तरप्रदेशातील कृष्णनारायण तिवारी आणि अंतिमा तिवारी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
संपादकीय भूमिका :अशी फसवेगिरी करणार्यांना कठोर शिक्षाच हवी !