मराठी भाषेला ‘राजभाषा’ हा सन्मान मिळाला, त्याला ५९ वर्षे झाली आहेत; पण ‘वस्तू भेटली’, ‘माझी मदत करशील का ?’ आणि ‘तो व्यक्ती’च्या…अशी भाषा वापरून या काळात आपण राजभाषेचा सन्मान राखत आहोत का ? हाच मुळात प्रश्न आहे.
१. प्राचीन मराठी भाषा आणि तिच्यावर परकीय शब्दांचे आक्रमण !
महाराष्ट्राचा अभिमान असलेली आपली मराठी भाषा ! मुसलमानी राजवटीत उर्दू आणि पर्शियन भाषेतील शब्दांनी मराठी भाषेवर आक्रमण केले; पण छत्रपती शिवरायांनी रघुनाथ पंडितांकडून राजभाषा कोश सिद्ध करवून घेतला. राजव्यवहार मराठीत होऊ लागला. नानासाहेब पेशवे, मोरोपंत अशा अनेकांनी मराठी भाषाशुद्धीची चळवळ पुढे नेली. निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी ती पालखी (मराठी भाषाशुद्धीची) इतकी सक्षमपणे पेलली की, त्यांना ‘मराठी भाषेचे शिवाजी’ ही पदवीच दिली गेली. केवळ व्यवहारातीलच नव्हे, तर शास्त्रीय परिभाषेतील शब्दही मराठीत वापरले जाऊ लागले. पुढे ब्रिटिशांचे राज्य आले. त्या वेळी जवळजवळ एक पिढीच इंग्रजाळली, तरीही मराठी आपला मान राखून होती; पण काँग्रेसच्या मुसलमानधार्जिण्या धोरणामुळे मराठीच नव्हे, तर हिंदी भाषेवरही उर्दू आणि पर्शियन शब्दांचे आक्रमण झाले.
२. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याकडून भाषाशुद्धीचा पुरस्कार !
छत्रपती शिवराय या आपल्या दैवताप्रमाणेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मराठी भाषेवरच्या आक्रमणाविरुद्ध भाषाशुद्धी चळवळ चालू केली. वर्ष १९२५ मध्ये ‘केसरी’त त्यांनी याविषयी लेखमाला लिहिली. प्रारंभीला त्याविरोधी सूर उमटला, साहित्य क्षेत्रात खळबळ माजली. सावरकर यांनी विरोधकांच्या आक्षेपांना आपल्या लेखातून उत्तरे दिली. कवी माधव ज्युलियन यांच्या कवितेत भरपूर फारसी शब्द असत. तेही सावरकर यांच्या विरोधात होते; पण पुढे मात्र तेही भाषाशुद्धीचा पुरस्कार करू लागले. इतकेच नव्हे, तर त्यांनी आपल्या कविता पुन्हा शुद्ध मराठीत लिहून काढल्या. त्यांचे लेख आणि भाषणे यांविषयीचे ‘भाषाशुद्धी विवेक’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. उर्दू आणि फारसी शब्दांना मराठी प्रतिशब्द असलेले कोश माधव ज्युलियन अन् अ.स. भिडे यांनी सिद्ध केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वत:च अनेक नवीन प्रतिशब्द निर्माण केले, काही जुने पुनरुज्जीवित केले. सावरकर यांनी निर्मिलेले ‘महापौर’, ‘हुतात्मा’, ‘दिग्दर्शक’, ‘कलागृह’, ‘छायाचित्रण’, ‘दिनांक’, ‘क्रमांक’ असे अनेक शब्द आज सहज रुळले आहेत.
३. मराठी भाषेला ‘ब्राह्मणी भाषा’ म्हणत द्वेष केला जाणे
आक्रमणकर्त्याचे आक्रमण केवळ देशावर नसते, तर ते संस्कृती आणि भाषा यांवरही होत असते. आता तर आपण स्वतंत्र आहोत, आपले महाराष्ट्र राज्य आहे, आपली मराठी भाषा आहे; पण जातीपातीच्या राजकारणाने देश, विशेषकरून महाराष्ट्र पुन्हा पोखरला गेला आहे आणि त्याचा फटका मराठी भाषेला बसतो आहे. जातीचे राजकारण मराठी भाषेचाही गळा आवळत आहे. आज ‘ब्राह्मणी भाषाच का प्रमाण मानायची ?’, हा विचार बोकाळला आहे. यात भाषेवरचे प्रेम नाही, तर ब्राह्मण द्वेष भरलेला आहे. मराठी भाषा केवळ ब्राह्मणांची थोडीच आहे. ती समस्त मराठी माणसाची आहे; पण केवळ आकसापोटी मराठी शब्द न वापरता चांगले शब्द उपलब्ध असतांनाही इंग्रजी शब्द वापरले जातात, तेव्हा विद्रूप होते तुम्हा आम्हा सगळ्यांचीच मराठी ! आपल्या भाषाभगिनी किंवा बोलीभाषेतील शब्द मराठीत रूढ झाले, तर कुणीच आक्षेप घेणार नाही. उलट त्यामुळे मराठी भाषा समृद्धच होत जाईल. यासाठी क्रिकेटचेच उदाहरण घेऊ. त्याला अगदी ‘चेंडूफळीचा खेळ म्हणावा’, ही अपेक्षा नाही; पण फलंदाज, गोलंदाज, फलंदाजी, गोलंदाजी, यष्टीरक्षक, धावचित, पायचित, चौकार, षटकार असे असंख्य सुंदर शब्द उपलब्ध असतांना इंग्रजी शब्द वापरण्याचा अट्टाहास का ? तर बहुजनांची भाषा हवी.
४. मराठी भाषेला तिचा सन्मान मिळवून देण्यासाठी शुद्ध मराठीत बोलणे आवश्यक !
इंग्रजी ही तर बहुजनांची भाषा नाही, मग हट्टाने इंग्रजी शब्द वापरून आपलीच मराठी भाषा विद्रूप का करत आहोत ? बातम्या, मालिका या माध्यमांतून या विचारांचा प्रसार आणि प्रचार होतो आहे. विशिष्ट विचारसरणीची माणसे हे जाणूनबुजून घडवत आहेत. त्यांना पालटणे आपल्या हाती नाही; पण निदान आपण प्रत्येकाने अगदी ब्राह्मणी नको; पण शुद्ध बोलायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे. केवळ दुकानांवरच्या पाट्या मराठीत लिहून हे होणार नाही. ‘मराठी कशी जिवंत रहाणार ?’, अशा चर्चा करूनही ते साधणार नाही, तर आपण प्रत्येकाने जातीपातीच्या पलीकडे जाऊन मराठीला तिचा सन्मान परत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध होऊया, शुद्ध मराठी बोलूया.
– मंजिरी मराठे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई
(साभार : साप्ताहिक ‘हिंदुस्थान पोस्ट, मराठी’ आणि मंजिरी मराठे यांचे फेसबुक)