पुणे – लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपने पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी भाजपवर गुन्हा नोंद करावा त्याखेरीज आंदोलनातून उठणार नसल्याची भूमिका धंगेकर यांनी घेतली आहे. १२ मे या दिवशी सायंकाळपासून त्यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडला आहे. पैसे वाटपाच्या तक्रारीची नोंद घेऊन अन्वेषण केले; मात्र याचे पुरावे सापडले नाहीत. पुरावा नसतांना कोणताही गुन्हा नोंद करता येत नाही, असे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. पुणे शहरात मोठा बंदोबस्त असून कलम १४४ लागू केले आहे. जे बेकायदेशीरपणाने जमाव करतील त्यांच्यावर गुन्हा नोंद होणार आहे, असेही पोलीस आयुक्त म्हणाले. भाजपचे पैशांचे ट्रक पुण्यात आले असून सर्रास पैशांचे वाटप केले जात असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.