पुणे – ‘मतदार सूचीतून नाव वगळले गेल्यास संबंधितांना मतदान करता येईल’, असा संदेश सामाजिक माध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे; मात्र हा संदेश चुकीचा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हा संदेश प्रसारित करणार्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू केल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिली आहे. मतदानाच्या संदर्भात चुकीचा संदेश किंवा अफवा पसरवल्यास कठोर कारवाई करण्याची चेतावणीही प्रशासनाने दिली आहे. मतदान सूचीत नाव नसल्यास ‘नमुना क्रमांक १७’चा अर्ज भरून आणि स्वत:चे मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल, असा दिशाभूल करणारा संदेश सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून मतदार नोंदणी कार्यालयात नागरिकांची चौकशीसाठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर मतदानाच्या संदर्भात दिशाभूल करणार्या संदेशापासून सर्वांनी सावध रहावे, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे संदेश पुढे पाठवू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सामाजिक माध्यमांतील संदेशामध्ये प्रसारित केलेली माहिती चुकीची आहे, असे स्पष्ट करून संबंधित व्यक्तीला २४ घंट्यांत खुलासा देण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिले आहेत. खुलासा प्राप्त न झाल्यास कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे. मतदार सूचीत नाव नसल्यास संबंधित नागरिकांना मतदान करता येणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.