YSRCP MLA Attacks Voter : आंध्रप्रदेशात आमदार आणि मतदार यांनी एकमेकांच्या श्रीमुखात भडकावली !

चौथ्या टप्प्यातील मतदान

नवी देहली – लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात १३ मे या दिवशी जम्मू-काश्मीरमधील ९ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ९६ जागांसाठी मतदान झाले. त्याच वेळी आंध्रप्रदेशच्या १७५ विधानसभा जागांवरही मतदान झाले. या मतदानाच्या वेळी आंध्रप्रदेशातील गुंटूर येथे वाय.एस्.आर्. काँग्रेसचे आमदार अण्णाबथुनी शिवकुमार यांनी एका मतदाराला थप्पड मारली. त्याला प्रत्युत्तर म्हणून मतदारानेही शिवकुमार यांना थप्पड मारली. यानंतर आमदार समर्थकांनी त्या व्यक्तीला मारहाण केली. रांगेत न आल्याने त्या व्यक्तीने आमदाराला अडवले होते, त्यामुळे वाद झाला होता. दुसरीकडे बिहारच्या मुंगेरमध्ये मतदानाच्या वेळी स्लिप न दिल्याने काही लोकांनी सुरक्षा कर्मचार्‍यांवर दगडफेक केली. पोलिसांनी लाठीमार करून २ तरुणांना कह्यात घेतले.

१. आंध्रप्रदेशात झहीराबादचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश शेटकर यांचा भाऊ नागेश शेटकर याने एका मतदाराला लाथ मारली. दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. यानंतर मतदाराची दुचाकी खाली पडली आणि ती उचलण्यासाठी गेले असता शेटकर यांनी त्यांना लाथ मारली.

२. बंगालमधील बोलपूर येथे मतदानाच्या आदल्या रात्री उशिरा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. तृणमूलने माकपच्या समर्थकांवर बाँबस्फोट केल्याचा आरोप केला आहे. तसेच राज्यातील दुर्गापूरमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस समर्थकांमध्ये हाणामारी झाली आहे. बीरभूममध्ये भाजपने तृणमूल समर्थकांवर स्टॉलची तोडफोड केल्याचा आरोप केला आहे.