Bomb Threat : देशातील १३ विमानतळे बाँबने उडवून देण्याची धमकी फसवी !

काही दिवसांपूर्वी देहलीतील १०० शाळा, तसेच कर्णावतीतील ७ शाळांनाही मिळाल्या होत्या आतंकवादी आक्रमणाच्या धमक्या !

नवी देहली – सध्या खोट्या धमक्या देण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी देहलीतील १०० शाळांना, तर कर्णावतीतील ७ शाळांना बाँबने उडवण्याची धमकी दिल्याचे ई-मेल प्राप्त झाले होते. आता देशातील १३ विमानतळे उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला १२ मे या दिवशी या आशयाच्या धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. याचे तातडीने अन्वेषण करण्यात आले.

देहलीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, लक्ष्मणपुरीचे चौधरी चरणसिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ, तसेच जम्मू, जयपूर, भोपाळ, तसेच पाटलीपुत्र विमानतळांवर बाँबच्या भीतीने दहशत पसरली. दिल्ली पोलिसांनी नंतर सांगितले की, ही धमकी फसवी होती आणि ई-मेल पाठवणार्‍यांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास करण्यात येत आहे. तर धमकी प्राप्त झाल्यावर लक्ष्मणपुरी विमानतळाच्या सुरक्षा पथकाने संपूर्ण विमानतळाची कसून तपासणी केली; परंतु ‘बाँब धमकी मूल्यांकन समिती’ने धमकी बनावट असल्याचे सांगितले. अन्य विमानतळांवरील धमक्याही खोट्या असल्याचे निष्पन्न झाले, असे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने सांगितले.

संपादकीय भूमिका

जिहादी आतंकवाद्यांकडून कोल्ह्याच्या गोष्टीप्रमाणे आधी बनावट धमक्या दिल्या जात आहेत का ? याचा संशय येतो. त्यामुळे उद्या खरंच आक्रमण करण्याचा बेत असलेल्या आतंकवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षायंत्रणांनी कोणताही हलगर्जीपणा करू नये !