|
टोकियो (जपान) – हिंदु धर्मानुसार विवाह म्हणजे दोन आत्म्यांचे सर्वार्थाने मिलन ! अशी ती प्रगल्भ संकल्पना आहे. सध्या मात्र याच्यापासून समाज दुर्दैवाने दूर चालला आहे. त्यातीलच एक प्रकार म्हणजे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ (विवाह न करता एकत्र रहाणे) होय. आता याही पुढे जाऊन जपानमध्ये एक नवीनच पद्धत रूढ होत चालली आहे. याचे नाव आहे – ‘फ्रेंडशिप मॅरेज’ ! या विवाहात दोघे जोडीदार अधिकृत पती-पत्नी तर असतात, परंतु त्यांच्यात शारीरिक संबंध किंवा प्रेम असेलच, याची आवश्यकता नाही. लग्नानंतरही ज्यांना स्वातंत्र्य हवे आहे, ते अशा लग्नाला पसंती देत आहेत.
१. ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’नुसार जपानमधील तब्बल १ टक्का लोकांनी अशा प्रकारच्या विवाहांना प्राधान्य दिले आहे. अशा विवाहानंतर जोडपे एकत्र राहू शकतात किंवा वेगळे रहाण्याचा निर्णय घेऊ शकतात. त्यांची इच्छा असल्यास कृत्रिम गर्भाधारणेद्वारेही ते मुले जन्माला घालू शकतात.
२. असा विवाह करणार्या एकाने सांगितले की, ‘फ्रेंडशिप मॅरेज’ म्हणजे समविचारी ‘रूममेट’ निवडण्यासारखे आहे. अशा लग्नात, जोडीदार घरचा खर्च कसा करायचा, कपडे कुणी धुवायचे, साफसफाई आणि इतर कामे कोण करणार, हे ठरवत असतात.
३. जोडपे लग्नाआधी अनेक तास किंवा दिवस एकत्र घालवतात. या वेळी दोघेही अनेक गोष्टींवर मोकळेपणाने बोलतात. एका अहवालानुसार ३२ वर्षांपेक्षा अधिक वयाचे तरुण या प्रकारच्या लग्नाला प्राधान्य देत आहेत.
संपादकीय भूमिका‘मी’पणाच्या विचारसरणीचा अतिरेक म्हणूनच अशा प्रकारच्या विकृत पद्धती रूढ होत आहेत, हे लक्षात घ्या ! जेवढा मनुष्य अहंकारामुळे कथित ‘स्वातंत्र्या’ची आस लावून बसेल, तेवढा तो दु:खी, असुरक्षित आणि रसातळाला जाईल ! |