भारतातील अमेरिकेच्या राजदूताचे अहंकारी वक्तव्य !
वॉशिंग्टन (अमेरिका) – भारताने पाश्चिमात्य देशांचा विरोध झुगारून २ वर्षांपूर्वी रशियाकडून तेल खरेदी करण्याचे प्रमाण पुष्कळ प्रमाणात वाढवले. त्यावरून अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी विधान केले आहे. ते म्हणाले, ‘भारताने रशियाकडून तेल विकत घेतले; कारण तेलाच्या किमती वाढू नयेत, ही अमेरिकेची इच्छा होती. आम्हाला रशियाचे तेल कुणीतरी विकत घ्यावे, असे वाटत होते. ही आमच्या धोरणाची रचना होती.’ गार्सेटी हे ‘आंतरराष्ट्रीय घडामोडींमधील वैविध्यता’ या विषयावर आयोजित एका परिषदेत बोलत होते.
१. गार्सेटी पुढे म्हणाले की, देहली येथे गेल्या सप्टेंबरमध्ये आयोजित ‘जी-२०’ परिषदेच्या वेळी भारताने युक्रेनविषयी वक्तव्य करूनही रशियाची बाजू घेतली. त्यामुळे रशियाला ते मारक ठरले नाही. आम्ही (अमेरिका) युरोपची बाजू घेऊ शकलो. यामुळे चीनसाठी ते मारक ठरले. या सर्वांतून भारत-अमेरिका संबंधांतील वैविध्यता लक्षात येते. हे एकदम प्रामाणिक संबंध आहेत.
२. गार्सेटी यांनी भारत-अमेरिका संबंधांना ‘आधुनिक प्रेमसंबंध’ असे वर्णन केले. ते म्हणाले की, पूर्वी आम्ही गुंतागुंतीच्या नात्यात होतो आणि आता आम्ही ‘प्रेमसंबंध’ ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही एकमेकांच्या सवयी समजून घेत आहोत आणि असे म्हणू शकतो की, आम्ही आता एकत्र रहात आहोत. भारताने स्पष्ट केले आहे की, त्याचे धोरण कोणत्याही गटापासून वेगळे रहाण्याचे आहे. म्हणजे त्यांना कोणत्याही गटाचा भाग व्हायचे नाही. त्यांना कुणाच्या सहवासाची आवश्यकता नाही. भारत लग्न न करता एकटे रहाणे पसंत करेल. भारत आणि अमेरिका हे जगातील दोन सर्वांत मोठे लोकशाही देश आहेत. दोघांमध्ये दोष आहेत. आपण स्वीकारले पाहिजे.
…. तर पेट्रोल किमान २० रुपयांनी महागले असते ! – परराष्ट्रमंत्री
भारताने रशिया-युक्रेन युद्धाच्या वेळी स्पष्ट केले होते की, आम्ही कुणाकडून तेल खरेदी करायचे आणि कुणाकडून नाही, हा आमचा निर्णय आहे. आम्ही कुणाच्याही दबावाखाली येणार नाही.
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी ११ मे या दिवशी अमृतसर येथे आयोजित एका प्रचारसभेत म्हटले की, रशियाकडून तेल आयात करू नये, यासाठी आमच्यावर दबाव टाकण्यात आला होता. विचार करा, जर आम्ही दबावाला बळी पडून रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले असते, तर लोकांसाठी पेट्रोलचे दर किमान २० रुपयांनी महाग झाले असते.
संपादकीय भूमिकायाला म्हणतात कावेबाजपणा ! वर्ष २०२२ मध्ये भारताला एकाकी पाडण्यासाठी अमेरिका आणि युरोपीय देश भारतावर रशियाकडून तेल विकत न घेण्यासाठी दबाव आणत होता. भारत सर्व विरोध झुगारून सक्षमपणे एकटा उभा राहिला. आता भारताच्या या धाडसामागे अमेरिकाच होती, हे अमेरिकेला सुचवायचे आहे. अशी ढोंगी अमेरिका कधीही भारताची मित्र होऊ शकत नाही ! |