सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार होत असलेले सनातनच्या ग्रंथनिर्मितीचे कार्य आणि ग्रंथांतील चैतन्यामुळे सर्व स्तरांवर होणारे लाभ !

१. सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांतील ज्ञान अनमोल असून ग्रंथनिर्मितीची सेवा करणार्‍या साधकांसाठी ही सेवा म्हणजे एक सुवर्णसंधी असणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘वर्ष १९८६ पासून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे विविध विषयांवरील ग्रंथांच्या निर्मितीचे कार्य चालू आहे. ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी असलेल्या साधकांसाठी ही सेवा म्हणजे एक सुवर्णसंधी असून गुरुकृपेमुळे ती मोक्षाप्रत नेणारी आहे. ही एक चैतन्यदायी सेवा असून पारमार्थिक ज्ञानदानाचे हे कार्य ‘साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी, तसेच समाजाचे प्रबोधन होऊन समाजाचाही उद्धार व्हावा’, यांसाठी आहे. सनातनच्या ग्रंथांत अमूल्य ज्ञान असून आत्मोन्नती साधण्यासाठी ते ज्ञान उपयुक्त आहे. या सेवेत ज्या साधकांनी त्यांचा खारीचा वाटा उचलला आहे, त्यांचा त्यातून उद्धार होत आहे.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ५ सहस्र ग्रंथांची निर्मिती करण्याचा संकल्प केलेला असून ‘कलियुगातील पाचव्या वेदा’च्या निर्मितीची प्रक्रिया चालू असणे

सनातन चे ग्रंथ

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा वेगवेगळ्या विषयांवर ५ सहस्र ग्रंथांची निर्मिती करण्याचा संकल्प आहे. यापूर्वीही धर्मग्रंथ आणि पुराणे यांतून समाजाला ज्ञान मिळाले आहे; पण त्या ज्ञानाचे महत्त्व लोकांना कळले नाही. काळाच्या आवश्यकतेमुळे ईश्वराने सनातनची ग्रंथसंपदा निर्माण करण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याद्वारे संकल्प केला आणि आता या ग्रंथांची, म्हणजे ‘कलियुगातील पाचव्या वेदा’ची निर्मिती चालू आहे.

३. सनातनच्या ग्रंथांमुळे कोणत्या गोष्टी साध्य होतात ?

आधुनिक पशूवैद्य अजय जोशी

अ. ग्रंथांमुळे साधक आणि समाज यांना धर्मशिक्षण मिळते. ‘सण आणि उत्सव यांमागील शास्त्र कळल्याने त्यातून ‘आध्यात्मिक लाभ कसा करून घ्यायचा ?’, हे कळते.

आ. ग्रंथांत दिलेले एखाद्या घटनेचे सूक्ष्म स्तरावरील ज्ञान, तसेच सूक्ष्म चित्रे यांमुळे सूक्ष्मातील घडामोडींविषयी माहिती मिळते.

इ. ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ याअंतर्गत असलेले टप्पे,

इ १. व्यष्टी साधना : स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन, २. अहं-निर्मूलन, ३. नामजप, ४. सत्संग, ५. सत्सेवा, ६.भावजागृतीसाठी करायचे प्रयत्न, ७. सत्साठी त्याग आणि ८. प्रीती

इ २. समष्टी साधना : राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यासंदर्भात करायची साधना’ यांविषयीचे ज्ञान ग्रंथांमुळे मिळते.

ई. साधक आणि जिज्ञासू यांना ‘व्यष्टी आणि समष्टी साधना म्हणजे काय ?’ ‘आध्यात्मिक प्रगती करून मानवाचे अंतिम ध्येय (मोक्षप्राप्ती) कसे साध्य करावे ?’, याची शिकवण मिळते.

उ. साधना करणार्‍या जिवांमध्ये ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ म्हणजे ‘संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे’, ही शिकवण रुजू लागते.

ऊ. समाजाकडून धर्मपालन होऊ लागते आणि धर्मावर आलेली ग्लानी दूर होण्यास साहाय्य होते.

४. ग्रंथांद्वारे ‘हिंदु धर्मशास्त्रानुसार योग्य कृती कशा कराव्यात ?’, याविषयीचे ज्ञान समाजापर्यंत पोचणे

४ अ. ‘देवापुढे तेलाऐवजी तुपाचा दिवा लावल्याने कोणते लाभ होतात ?’ याची माहिती मिळणे : सनातनच्या ग्रंथांतून विविध धार्मिक कृतींमागील शास्त्र कळते, उदा. ‘देवघर आणि पूजेतील उपकरणे’ या ग्रंथात ‘देवापुढे तुपाचा दिवा लावल्याने कोणते लाभ होतात ?’, याविषयीचे शास्त्र सूक्ष्म चित्रांच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यामुळे वाचकांना त्याचे लवकर आकलन होते. ‘तुपाच्या दिव्यामुळे स्वर्गलोकापर्यंतच्या सात्त्विक लहरी खेचल्या जाऊन व्यक्तीचे मन शांत, स्थिर आणि समाधानी बनते. तेलाचा दिवा वातावरणातील १ मीटर अंतरापर्यंतच्या सात्त्विक लहरी खेचून घेतो. तेलाच्या दिव्यामुळे व्यक्तीच्या प्राणमय कोषातील रजोगुणाचे प्राबल्य वाढून जिवाला चंचलता येते’, आदी शास्त्र ग्रंथामुळे कळते.

४ आ. ‘शास्त्रोक्त पद्धतीने गुढीपाडवा कसा साजरा करावा ?’, याविषयीचे शास्त्र कळणे : ‘गुढीपाडवा’ साजरा करतांना ‘शास्त्रोक्त पद्धतीने गुढी कशी उभी करायची ? तिचे महत्त्व काय ? या दिवशी कडूनिंबाच्या पानांची चटणी का खाल्ली जाते ? त्याचे आध्यात्मिक महत्त्व काय ?’, इत्यादी विषयांची माहिती ‘सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र’ या ग्रंथात दिली आहे. अशा प्रकारे योग्य माहिती मिळाल्यामुळे समाजातील जिज्ञासूंना तशी कृती करून आध्यात्मिक लाभ मिळवता येत आहे.

५. आगामी काळात सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचे महत्त्व !

५ अ. सनातनचे ग्रंथ चिरकाल टिकतील ! : पुढील काळात सनातनच्या ग्रंथांचा वाचकवर्ग झपाट्याने वाढेल. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्यातून या ग्रंथांची निर्मिती होत आहे, तसेच यातील ज्ञान अनुभूतीजन्य असल्यामुळे यातून धर्मप्रसाराचे कार्य होईल आणि ते चिरकाल टिकेल ! येत्या २०० वर्षांत ५ पिढ्या हे ग्रंथ आस्थेने वाचतील. या कालावधीत या लिखाणाचा ‘संदर्भासाठी, तसेच अधार्मिक गोष्टींचे खंडण करण्यासाठी वापर करण्यात येईल. धार्मिक दृष्टीने ग्रंथांतील लिखाणाचा मुख्य आधार घेण्याइतपत या ग्रंथांचे महत्त्व वाढेल ! ‘ग्रंथांचे वाचन करून आध्यात्मिक उन्नती सहजतेने करता येते’, याची जनमानसात जाणीव होईल.

५ आ. सनातनचे ग्रंथ हे धर्मशिक्षण घेण्याचे एकमेव माध्यम होऊन त्यातून जगाला हिंदु धर्माचे महत्त्व पटेल ! : पुढील पिढ्यांना शंकानिरसन करण्यासाठी सनातनच्या ग्रंथांचा वापर करणे अनिवार्य ठरेल. हे ग्रंथ धर्मशिक्षण घेण्याचे एकमेव माध्यम होऊन त्यातून जगाला हिंदु धर्माचे महत्त्व समजेल ! सामाजिक प्रसारमाध्यमे, ‘ई. बुक’, आदींद्वारे जिज्ञासूंना आवश्यक ते आध्यात्मिक विषय समजून घेता येतील. आधुनिक पिढी या ग्रंथांचा खरा उपयोग करून घेईल.

६. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता !

ग्रंथनिर्मितीची सेवा करणार्‍या साधकांनी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने ही सेवा करण्यास मिळत आहे’, या कृतज्ञतेच्या भावात रहावे आणि तन-मन-धन अर्पून ही सेवा करावी. प्रभु श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी जसा भक्तांचा उद्धार केला, तसाच उद्धार कलियुगात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले करत आहेत. त्यामुळे त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– आपल्या सेवेसी,

आधुनिक पशूवैद्य अजय गणपतराव जोशी (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ६८ वर्षे), फोंडा, गोवा. (९.७.२०२३)