पुणे – शेअर बाजारातील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाला भुलून पदरी फसवणूक आलेल्या जावेद इनामदार या सेवानिवृत्त अधिकार्याला गुन्हा नोंद करण्यासाठी कोंढवा पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागत आहेत. संबंधित अधिकार्याला अपघातामुळे अपंगत्व आले असून पोलिसांकडून सहकार्याच्या ऐवजी अरेरावी होत असल्याचा आरोप संबंधित अधिकार्याने केला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकार्याने परिमंडळाच्या उपायुक्तांसह विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाकडेही तक्रार केली आहे.
कोंढव्यात रहाणारे जावेद इनामदार यांची दोघांनी ६ लाख रुपयांची फसवणूक केली. इनामदार राज्य सरकारच्या ग्रामीण विकास विभागात वरिष्ठ अधिकारी पदावरून निवृत्त झाले. कर्तव्यावर असतांना काही वर्षांपूर्वी रस्ते अपघातात त्यांना अपंगत्व आले आहे. सेवानिवृत्तीनंतर भविष्य निर्वाह निधी किंवा अन्य माध्यमातून मिळालेले पैसे इनामदार यांनी २ व्यक्तींकडे गुंतवले. एकाकडे २ लाख आणि दुसर्याकडे ४ लाख रुपये गुंतवले; मात्र अद्याप त्यांना गुंतवणुकीवरील नफा किंवा मुद्दलही परत मिळालेली नाही. त्यामुळे इनामदार यांनी २२ डिसेंबर २०२३ या दिवशी कोंढवा पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता.
इनामदार यांनी सांगितले की, पोलीस निरीक्षकांना भेटण्याच्या बहाण्याने मला पोलीस ठाण्याला बोलावून घेण्यात आले. प्रत्यक्षात मात्र भेट झालीच नाही. तपास पथकाच्या खोलीत बसवून संबंधित तपासाधिकारी आणि अन्य काही कर्मचारी यांनी माझ्याकडेच चौकशी करण्यास चालू केले. तेथे उपस्थित असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने मला दम दिला. माझी फसवणूक करणारे दोघेही जण तेथे उपस्थित होते. दरम्यान, ‘तुम्हाला पैसे मिळाले आहेत, त्यामुळे गुन्हा नोंद होऊ शकत नाही’, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर ‘दिवाणी प्रकरण आहे’, असे सांगून न्यायालयात खासगी दावा प्रविष्ट करण्याचा सल्लाही देण्यात आला.
संपादकीय भूमिका :असे पोलीस काय कामाचे ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? |