दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मुलुंड येथे ४७ लाख रुपयांची रक्कम जप्त ! ; मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ! …

मुलुंड येथे ४७ लाख रुपयांची रक्कम जप्त !

मुंबई – मुलुंड परिसरात एका चारचाकीतून पोलिसांनी ४७ लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. पोलिसांनी ही रक्कम, गाडी आणि गाडीचालक यांना कह्यात घेतले असून या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.


मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात !

३ जणांचा मृत्यू, ८ जण घायाळ

मुंबई – मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीजवळ भीषण अपघात झाला आहे. ब्रेक निकामी झाल्यामुळे एका ट्रकने समोर असलेला टेम्पो आणि चारचाकी यांना धडक दिली. यात चारचाकीमधील दोघांचा आणि ट्रकचालकाचा मृत्यू झाला आहे. अन्य ८ जण घायाळ झाले आहेत. अपघातातील घायाळ झालेल्यांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत.


कंटेनरमधून ४२ लाखांच्या कपड्यांची चोरी !

मुंबई – सीमाशुल्क चुकवून चीनमधून आलेल्या कंटेनरमधून ४२ लाखांच्या कपड्यांची चोरी झाली. हा कंटेनर वर्ष २०२२ मध्ये कह्यात घेऊन शिवडीतील गोदामात ठेवण्यात आला होता. या प्रकरणी सीमाशुल्क विभागाने शिवडी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवलेला आहे.


चेंबूर येथे विषारी वायूमुळे शारीरिक समस्यांमध्ये वाढ !

चेंबूर – चेंबूर परिसरात रासायनिक आस्थापनांतून सतत विषारी वायू हवेत मिसळत आहे. यामुळे श्वसनाचे विकार, दमा, त्वचा काळी पडणे, पोट दुखणे, बुरशीजन्य आजार, डोळ्यांची जळजळ होणे या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. चेंबूर, मानखुर्द, ट्रॉम्बे परिसरातील नागरिकांना त्याची झळ पोचत आहे. या परिसरात रहाणार्‍या लोकांचे आरोग्य सुरक्षित नसल्याचे हरित लवाद आणि न्यायालयाने मान्य केले आहे. प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे.