मुंबई – अधिवक्ते गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी अधिवक्त्या जयश्री पाटील यांचे ‘स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेतील संचालकपद रहित करण्यात आले आहे.
यापुढे एस्.टी.च्या (राज्य परिवहन मंडळाच्या) बँकेवर तज्ञ संचालक म्हणून कामकाज करू शकणार नाही, असा निर्णय सहकार विभागाने दिला आहे. एस्.टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये सहकार आयुक्तांकडे दोघांविरोधात तक्रार केली होती. सदावर्ते चुकीचा कारभार करत असल्याचा आरोप संदीप शिंदे यांनी केला होता. त्यानंतर सदावर्ते यांनी नियम मोडल्याचे निरीक्षण नोंदवत सहकार विभागाने दोघांवर ही कारवाई केली.
गुणरत्न सदावर्ते यांचे मेहुणे सौरभ पाटील यांची स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केल्यापासून बँकेचा व्यवहार तोट्यात आला आहे. सदावर्ते आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मनमानी निर्णयांमध्ये सभासदांनी १८० कोटी रुपयांच्या ठेवी काढून घेतल्या. त्यामुळे सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीला बँकेच्या तांत्रिक मंडळावरून काढून टाकण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे विधान परिषदेचे सदस्य अनिल परब यांनी केली होती.