मुंबईत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा रोकड आणि अवैध मद्य जप्त !

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्याचे मतदान झाले असतांनाच निवडणूक आयोगानेही मुंबई उपनगरांत जवळपास २० कोटी रुपयांची रोकड आणि ५६ सहस्र लिटरहून अधिक अवैध मद्य जप्त केले आहे.

मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक कार्यालयाअंतर्गत मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई उत्तर पूर्व हे चार लोकसभा मतदारसंघ येतात. या चारही मतदारसंघांत निष्पक्ष निवडणूक व्हावी, यासाठी आयोगांतर्गत मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक कार्यालयाने विशेष पथकांची नेमणूक केली आहे. या पथकांनी २४ घंटे देखरेख चालू केली असून त्याअंतर्गत वरील कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. ‘निवडणुकीच्या काळात मतदारांना प्रलोभने दाखवण्यासाठीची रोकड, अवैध मद्य यांवर २८२ पथकांकडून लक्ष्य ठेवले जात आहे. त्यामध्ये १३४ भरारी पथके आणि १४८ बैठी पथके यांचा समावेश आहे. ही पथके प्रमुख नाक्यांवर तैनात आहेत. या पथकांनी आतापर्यंत विनापरवाना वाहतूक होणारी ९९ लाख ६५ सहस्र रुपये मूल्याची ५६ सहस्र ३८६ लिटर दारू जप्त केली आहे. एकूण २९७ कारवायांमध्ये ही जप्ती झाली आहे. या पथकांनी १ कोटी ५० लाख ४२ सहस्र रुपयांची अवैध रोख रक्कमही पकडली आहे.

निवडणूक आयोगाच्या विशेष पथकांखेरीज सीमा शुल्क, महसूल गुप्तचर संचालनालय (डी.आर्.आय.), उत्पादन शुल्क, प्राप्तीकर विभाग, पोलीस अशा जवळपास २२ विभागांची विशेष पथकेदेखील २४ घंटे तपास मोहिमेत सहभागी झाली आहेत. यांपैकी डी.आर्.आय. आणि सीमा शुल्क विभागाने मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण १७.९३ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. या रोखीची १० लाख रुपये मर्यादा नियमानुसार तपासणी चालू आहे.

संपादकीय भूमिका :

  • निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणावर सर्वत्र होणारे अपप्रकार व्यवस्थेचे अपयश दर्शवतात !
  • प्रलोभने देऊन मतदान होत असेल, तर लोकशाहीची मूल्ये कशी जपली जातील ?